पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांच्यात गुरूवारी फोनवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीविषयी चर्चा झाली. दरम्यान, यानंतर भारतात लसींची कमतरता दूर होऊ शकते, अशा शक्यता वर्तवण्यात येत आहेत. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांच्याकडूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा फोन करण्यात आल्याचं एएनआयनं सूत्रांच्या हवाल्यानं सांगितलं आहे.
कमला हॅरिस आ्रणि पंतप्रधान मोदी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर मोदींनी ट्विटरद्वारे याची माहिती दिली. "काही वेळापूर्वीच कमला हॅरिस यांच्याशी चर्चा झाली. जगभरात लसींचा पुरवठा करण्याच्या अमेरिकेच्या रणनितीचा एक भाग म्हणून लस पुरवण्याच्या आश्वासनाचं मी कौतुक केलं. याशिवाय अमेरिकन सरकार, व्यावसायिक, उद्योजक आणि प्रवासी भारतीयांना मिळालेल्या समर्थनासाठी मी त्यांचे आभार मानले," असं मोदी यांनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केलं आहे. लसीबाबत भारत आणि अमेरिकेदरम्यान सुरू असलेल्या सहकार्याबद्दलही चर्चा झाली, असंही त्यांनी म्हटलं.