नवी दिल्ली : अलीकडेच पठाणकोट हल्ल्याच्या वेळी दहशतवाद्यांना तोंड देण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा गटाने (एनएसजी) व्हीव्हीआयपींच्या सेवेतील ६०० कमांडोंना परत बोलावत या मोहिमेत सहभागी करवून घेतले होते. एनएसजी कमांडोचे मूळ कर्तव्य दहशतवादविरोधी मोहिमांमध्ये सहभागाचेच असून, त्यांना परत बोलावण्याची ही पहिलीच वेळ होती.दोन वर्षांपासून या योजनांवर विचार केला जात होता. पठाणकोट येथील हवाई तळावर अतिरेक्यांनी हल्ला केल्यानंतर प्रतिहल्ल्यासाठी प्रथमच ब्लॅक कॅट कमांडोंचा वापर करण्यात आला. ११ व्या स्पेशल रेंजर्स ग्रुपमधील(एसआरजी) दोन चमू व्हीव्हीआयपींच्या सुरक्षेसाठी उपयोगात आणल्या जातात. विशेष कृती दलाच्या(एसएजी) मदतीसाठी या चमूंना परत बोलावण्यात आले. १९८४ मध्ये केवळ विशेष अतिरेकीविरोधी मोहिमांसाठी एनएसजीची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर या दलाकडे व्हीव्हीआयपींची सुरक्षा सोपविण्यात आली. सध्या किमान १५ व्हीव्हीआयपींना एनएसजीची सुरक्षा पुरविण्यात आली आहे. आणखी दोन वर्षे या दलाकडे सुरक्षेची अतिरिक्त जबाबदारी सोपविली जाणार नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
व्हीव्हीआयपींच्या सेवेतील ६०० कमांडोंचा वापर
By admin | Published: February 15, 2016 3:42 AM