- संतोष ठाकूर
नवी दिल्ली : येत्या २ ऑक्टोबर म्हणजे महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून देशातील लांबपल्ल्याच्या सर्व रेल्वेगाड्यांत बायोटॉयलेटस् पाहायला मिळतील. रेल्वे बोर्डाचे सदस्य राजेश अग्रवाल यांनी सांगितले की, हे काम वेगाने सुरू असून, रेल्वेमंत्री पीयूष गोयल त्यावर देखरेख ठेवून आहेत.
याखेरीज सफाई कर्मचाऱ्यांसाठी एक नवे अॅप विकसित करण्यात आले असून, तेही गांधी जयंतीपासून सुरू होईल. रेल्वेच्या सफाईची जबाबदारी असलेल्या कर्मचा-यांना या अॅपच्या आधारे हजेरी लावावी लागेल आणि रेल्वेच्या कोचमध्ये सफाई केल्यानंतर त्याचे छायाचित्र त्या अॅपवर टाकणेही त्याच्यावर बंधनकारक असेल. या अॅपमुळे रेल्वेगाड्यांत स्वच्छता दिसू शकेल.
रेल्वेचे सर्व कारखाने व कोच फॅक्टरी अपारंपरिक ऊ र्जेवर चालावेत, असेही आमचे प्रयत्न आहेत, असे सांगून अग्रवाल म्हणाले की, रेल्वेच्या सा-या इमारतीही अशाच विजेवर चालवण्यासाठी तयारी सुरू आहे. दिल्लीतील रेल भवनातही अपारंपरिक विजेचा वापर व्हावा, यासाठी रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगाडी यांना सूचना दिल्या आहेत.