नवी दिल्ली- भारत सरकारकडून विमान प्रवसाची बोर्डिंग प्रक्रिया पूर्णपणे पेपरलेस करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी आता भारतात कुठेही विमानाने प्रवास करण्यासाठी तुमच्याकडे फक्त तुमचा मोबाइल फोन असणं गरजेचं आहे. उड्डाण मंत्रालयाकडून एअरलाइन्स आणि एअरपोर्टच्या डेटाबेसला प्रवाशांच्या आयडी कार्ड म्हणजेच आधार कार्ड आणि पासपोर्ट नंबरशी जोडण्याचं काम सुरू करण्यात येणार आहे. उड्डाण सचिव आर.एन चौबे यांच्या माहितीनुसार, ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर प्रवासी बायोमॅट्रीक टेकनिकचा वापर स्वतःची ओळख दाखवायला करू शकतात. यामुळे त्यांना एअरपोर्टवर त्यांचं आयडी कार्ड दाखवायची गरज पडणार नाही. विशेष म्हणजे प्रवाशांना त्यांचं तिकीट किंवा ई-तिकीट दाखवायची गरज पडणार नाही. एअरलाइन्सच्या डेटाबेसमध्ये तिकीट बुक केल्याची माहिती सेव्ह होणार असल्याने, तिकीट पुन्हा दाखवायची गरज नाही.
डेटाबेस लिंक केल्यामुळे जेव्हा प्रवासी बोर्डिंग गेटवर आल्यावर त्याचं आधी सिक्युरिटी चेकइन झालं आहे की नाही तेसुद्धा समजणार आहे. 'आम्ही एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियासाठी एख विशेष युनिट तयार केलं असून त्या युनीटकडून 'डीजी यात्रा' योजनेला आकार देण्याचं काम करतं आहे. एअरपोर्ट ऑपरेटर विशेषकरून बंगळुरू आणि हैदराबादच्या ऑपरेटर्सचा या युनिटमध्ये सहभाग आहे, अशी माहिती उड्डाण सचिव आर.एन चौबे यांनी दिली आहे .या योजनेच्या खर्चाची आणि त्यासाठी लागणाऱ्या वेळेची माहिती लवकरच मिळणार आहे, त्यानंतरच अंमलबजावणी केली जाईल, असंही उड्डाण सचिव म्हणाले आहेत.
दुसरीकडे,एअरपोर्ट अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार डेटाबेसमुळे विमानाच्या उड्डाणाची वेळ झाल्यावर बोर्डिंग गेटमधून प्रवेश देता येईल. यामुळे प्रवाशांची अनावश्यक गर्दी संपेल तसंच वेळेच्या आधी बोर्डिंग गेटजवळ येऊन उभं राहणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीला यामुळे चाप बसेल. या नव्या बायोमॅट्रीक योजनेमुळे बोर्डिंग कार्डावर सिक्युरिटी चेकसाठी लावल्या जाणाऱ्या स्टॅम्पपासून पण मुक्ती मिळेल. सध्या विमान प्रवास करण्यासाठी बोर्डिंग पासवर स्टॅम्प गरजेचा आहे. जे प्रवाशांचं विमानतळावर सिक्युरिटी चेकिंग झालं असतं अशांच्या बोर्डिंग कार्डवर स्टॅम्प लावले जातात.
देशात सध्या 17 एअरपोर्टवर हॅण्डबॅगेवर स्टॅम्पिंग प्रक्रियेवर बंदी घातली गेली आहे. तसंच दहा एअरपोर्टवर यासाठीचं ट्रायल सुरू आहे.