श्रीनगर/नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमधून भारतात घुसखोरी करणारे पाक प्रशिक्षित दहशतवादी भारतीय लष्कराच्या इलेक्ट्रॉनिक टेहळणीला चकमा देण्यासाठी त्यांच्या स्मार्टफोनवर खास प्रकारचे कॅलक्युलेटर अॅप वापरत असल्याचे उघड झाले आहे. यामुळे हे घुसखोर पाकिस्तानातील त्यांच्या ‘हॅण्डलर’शी कायम संपर्कात राहू शकतात.जम्मू-काश्मिरात घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांच्या स्मार्ट फोनमध्ये नवा ‘कॅलक्युलेटर’ हा अॅप आढळला आहे. या अॅपमुळे दहशतवाद्यांना पाकव्याप्त काश्मिरात बसलेल्या आपल्या प्रमुखांशी संपर्क साधण्यात आणि भारतीय लष्कराकडून केल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक टेहळणीतून वाचण्यास मदत मिळते, असे दिसून आले आहे. या वर्षी पाकव्याप्त काश्मिरातून घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्यानंतर हे दहशतवादी स्मार्ट फोन सोबत घेऊन आले होते, ज्यात कोणताही संदेश नव्हता, असे आढळले आहे.या तंत्रज्ञानाचा वापर सर्वांत आधी अमेरिकेच्या कॅटरिना चक्रीवादळादरम्यान वादळग्रस्तांशी संपर्क करण्यासाठी एका कंपनीने केला होता. लष्कर-ए-तोयबाच्या काही दहशतवाद्यांची चौकशी केल्यानंतर ही माहिती उघड झाली. या दहशतवादी संघटनेने स्वत:ला अत्याधुनिक बनविले आहे आणि कॅलक्युलेटर नावाचा नवा अॅप तयार केला आहे, जो डाऊनलोड केला जाऊ शकतो आणि तो मोबाईल नेटवर्क नसतानाही काम करतो. हे तंत्रज्ञान कॉग्निटिव्ह डिजिटल रेडिओच्या संकल्पनेवर आधारित आहे. त्याचा वापर करणारा आपल्या स्मार्ट फोनला विना नेटवर्क असलेल्या दूरसंचार उपकरणासारखा उपयोगात आणू शकतो.हे नेटवर्क स्वत:चे सिग्नल तयार करते आणि निश्चित अंतरावर उपस्थित असलेल्या दुसऱ्या युनिटसोबतही संपर्क स्थापित करू शकते. तसेच या दोघांदरम्यान संदेशाचे आणि जीपीएस स्थळांचे आदानप्रदान करणे शक्य होते.
दहशतवाद्यांकडून ‘कॅलक्युलेटर’ अॅपचा वापर
By admin | Published: June 06, 2016 2:03 AM