भोपाळ : मध्यप्रदेशातील पथ विक्रेता (फेरीवाले) आत्मनिर्भर निधीच्या लाभार्थ्यांशी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधताना पिण्याच्या पाण्यासाठी प्लास्टिकच्या बाटलीऐवजी व पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी मातीचा माठ, घड्याचा वापर करण्याचा सल्ला दिला.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी इंदूर जिल्ह्यातील सनवेर येथील छगनलाल आणि त्यांच्या पत्नी, ग्वाल्हेरच्या अर्चना शर्मा आणि रायसेस जिल्ह्यातील भाजीपाला विक्रेता दालचंद यांच्याशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी छगनलाल यांना व्यवसाय वाढविण्याचा सल्ला दिला.
झाडूच्या मुठीसाठी वापरला जाणारा पाईप ग्राहकांकडून परत घेतल्यास झाडू तयार करण्यासाठीचा खर्च कमी होईल आणि पर्यायी व्यवसाय वाढेल, तसेच पिण्याच्या पाण्यासाठी मातीचा घडा वापरण्याचा सल्लाही पंतप्रधानांनी दिला. उज्ज्वल योजना आणि या योजनेचा कुटुंबियास कसा लाभ झाला, याबाबतही पंतप्रधानांनी त्याला विचारले.ग्वाल्हेरच्या अर्चना शर्मा अािण त्यांचे पती हातगाडीवर पाणीपुरी, पॅटीस विक्री करतात. मलाही पॅटीस द्याल का? असे विचारत पंतप्रधानांनी स्वनिधी योजना आणि या योजनेचा काय फायदा झाला, असे अर्चना शर्मा यांना विचारले. आयुषमान योजनेतून माझ्या पतीवर उपचार करता आले, असेही अर्चना यांनी यावेळी सांगितले. भाजीपाला विक्रेता दालचंद हे ग्राहकांकडून पैसे घेण्यासाठी क्यूआर कोड या डिजिटल माध्यमाचा वापर करीत असल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांची प्रशंसा केली.