नवी दिल्ली : इतर देशांच्या ऑनलाईन व ऑफलाईन इन्फ्रास्ट्रक्चरवर सायबर हल्ले करण्यासाठी विविध देशांकडून आतापर्यंत समर्पित पथकांचा वापर केला जात होता. मात्र, २०२२ मध्ये अशा देशांकडून थेट हॅकर्स कामावर ठेवून सायबर हल्ले केले जाऊ शकतात, असा इशारा एका अहवालात देण्यात आला आहे.जागतिक सायबर सुरक्षा संस्था, मॅकएफी एंटरप्रायजेसने फायरआयच्या मदतीने हा अहवाल जारी केला आहे. अहवालात म्हटले आहे की, व्यापारी संस्थांत घुसखोरी करण्यासाठी समाजमाध्यमांचा वापरही असे देश करू शकतात. अधिकाधिक व्यावसायिकांना लक्ष्य करण्यासाठी शासकीय यंत्रणांकडून समाजमाध्यमांचा शस्त्रासारखा वापर केला जाईल. आपल्या गुन्हेगारी लाभासाठी सरकारी यंत्रणांची संस्थांत घुसखोरी करणे नवे नसले, तरी आजपर्यंत ही बाब तुलनेने दुर्मिळ स्वरूपात होती.अहवालात म्हटले आहे की, एखाद्याला व्यक्तीश: लक्ष्य करणे हे अत्यंत यशस्वी साधन असल्याचे सिद्ध झाले आहे. या साधनाचा वापर वाढेल, असा आमचा अंदाज आहे. केवळ हेरगिरी समूहाच्यामार्फतच नव्हे, तर इतर धोकादायक व्यक्ती व संस्थांच्या मार्फतही या साधनांचा वापर करून घेतला जाऊशकतो.अहवालात पुढे म्हटले आहे की, सायबर गुन्हेगारांनी २०२१ मध्ये ज्या यशस्वी युक्त्या वापरल्या, त्याचा वापर करून २०२२ साठी अधिक अद्ययावत साधनांचा विकास ते करू शकतात. त्याचा वापर जगभरात हाहाकार उडवून देण्यासाठी केला जाऊ शकतो.
नवे सायबर कल काय आहेत, याबाबत अद्ययावत राहावेमॅकएफी आणि फायरआयचे मुख्य शास्त्रज्ञ राज समानी यांनी सांगितले की, सायबर सुरक्षेचा वाढता धोका आणि जागतिक साथीचा कायम असलेला परिणाम या पार्श्वभूमीवर व्यावसायिक संस्थांनी नवे सायबर कल काय आहेत, याबाबत अद्ययावत राहणे आवश्यक आहे. याद्वारे त्यांना आपल्या माहितीचे संरक्षण करण्यासाठी सक्रिय राहता येऊ शकते.