नवी दिल्ली : कोरोना साथीच्या काळात लोकांनी प्रार्थनास्थळांमध्ये गेल्यानंतरही मास्क कायम ठेवावा. मास्क घालण्यास देवाने मनाई केलेली नाही. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी लोकांनी आवश्यक ती सर्व बंधने पाळावीत, असे आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केले आहे.
देशातील कोरोनाची स्थिती व या संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारने केलेली तयारी याबाबत सोशल मीडियावरून विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे डॉ. हर्षवर्धन यांनी एका कार्यक्रमात दिली. ते म्हणाले की, केवळ मंदिरे किंवा अन्य प्रार्थनास्थळांतच नव्हे तर प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी जाताना लोकांनी मास्क घातला पाहिजे. प्रार्थनास्थळे पुन्हा खुली करताना काय दक्षता घ्यावी, याबद्दल केंद्र सरकारने याआधीच सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांचे काटेकोर पालन होत आहे किंवा नाही, हे पाहणे ही राज्य सरकारांची जबाबदारीआहे.डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले की, कोरोना विषाणूच्या संसर्गाचा श्वसनसंस्थेव्यतिरिक्त हृदय व अन्य अवयवांच्या कार्यावर परिणाम होतो, असा निष्कर्ष एका संशोधनातून काढण्यात आला आहे. त्या निष्कर्षाची केंद्र सरकारने दखल घेतली आहे. अशा संशोधनातील निष्कर्षांचा विचार करण्यासाठी केंद्र सरकारने तज्ज्ञ मंडळींची एक समिती नेमली आहे. ते या मुद्यांचा विचार करून केंद्र सरकारला योग्य त्या शिफारसी करीत असतात. त्यानुसार मग सरकार आपली धोरणे आखते. इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेनेही कोरोना संसर्गाच्या विविध दुष्परिणामांचा अभ्यास करावा, असा आदेश केंद्र सरकारने दिला आहे.रेमडेसिवीर, प्लाझ्मा थेरपीचामोठ्या प्रमाणावर वापर नकोडॉ. हर्षवर्धन म्हणाले की, देशात कोरोनावरील उपचारांसाठी रेमडेसिवीर व प्लाझ्मा थेरपीचा मोठ्या प्रमाणावर वापर सध्या सुरू आहे. त्याचे प्रमाण कमी करावे, असे विविध राज्य सरकारे तसेच खासगी रुग्णालयांना सांगण्यात आले आहे.