जिनिव्हा : कोरोनाच्या डेल्टा या नव्या प्रकारच्या विषाणूचा संसर्ग झालेल्यांची संख्या जगभरात वाढत आहे. त्यामुळे ज्यांनी कोरोना लस घेतली आहे, त्यांनीही यापुढे मास्क वापरणे, शारीरिक अंतर राखणे आदी नियमांचे पालन सुरूच ठेवावे, अशी सूचना जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे.संघटनेच्या औषधे व आरोग्य उत्पादने विभागाच्या सहायक महासंचालक मरिआंगेला सिमाओ यांनी सांगितले की, कोरोनाला केवळ लस घेतल्यामुळे रोखता येणार नाही. त्यासाठी मास्कचा नेहमी वापर केला पाहिजे. अतिशय घातक असलेला डेल्टा विषाणू अनेक देशांत पसरत असल्याने लस घेतलेल्यांनीही पूर्ण दक्षता घ्यावी. कोरोनाचे नवे विषाणू निर्माण होत आहेत. युरोपात रुग्णांची संख्या कमी होताना दिसत असली, तरी जगभरात या साथीने डेल्टाच्या रूपाने वेगळे वळण घेतल्याने कोणालाही दुर्लक्ष करता येणार नाही, असेही सिमाओ यांनी सांगितले.
८५ देशांत फैलावजागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक अधनोम घेब्रिसस यांनी सांगितले की, डेल्टा विषाणूचे अस्तित्व सर्वप्रथम भारतात आढळून आले. हा विषाणू आतापर्यंत ८५ देशांत पसरला आहे. गरीब देशांकडे लसींचा पुरेसा साठा नसल्याने तिथे अनेकांना लस मिळालेली नाही. अशा देशांत डेल्टा विषाणूचा मोठा फैलाव होण्याची दाट शक्यता आहे. कोरोना विषाणूंत डेल्टा हा सर्वाधिक संसर्गजन्य आहे.
इंग्लंडमध्ये रुग्ण ४६ टक्क्यांनी वाढले nदरम्यान, इंग्लंडमध्ये दुसऱ्या लाटेमुळे रुग्णसंख्या वेगाने वाढू लागली आहे. मागील ३ दिवसांत इथे दररोज १५ हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. सरकारने दिलेल्या माहितीनुसार इंग्लंडमध्ये आढळून आलेल्या डेल्टा व्हेरिएंटच्या रुग्णांमध्ये एका आठवड्यात तब्बल ४६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. nया आठवड्यात डेल्टा व्हेरिएंटचे ३५,३०४ रुग्ण आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १ लाख ११ हजार १५७ इतकी झाली आहे. या देशात ५० वर्षांहून अधिक वयोगटातील ८३ टक्के लोकांना कोरोना प्रतिबंधासाठी दोन्ही लसी देण्यात आल्या आहेत.
‘दुसरीइतकी तिसरी लाट भीषण नसेल’नवी दिल्ली : कोरोना साथीची तिसरी लाट दुसऱ्या लाटेइतकी भीषण असण्याची शक्यता नाही, असा निष्कर्ष इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने एका अभ्यासातून काढला आहे. कोरोनाची दुसरी लाट निवळत असून तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त होत असतानाच तसेच डेल्टा प्लस या नव्या विषाणूचे ४८ रुग्ण सापडल्याच्या पार्श्वभूमीवर हे निष्कर्ष हाती आले आहेत.
८८७ विषाणूंचा अभ्यास लंडन : प्राण्यांमधील ८८७ विषाणूंची एक यादी शास्त्रज्ञांनी तयार केली असून त्यातील ३० विषाणू घातक आहेत. कोरोनामुळे जगाचे हाल झाले, त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शास्त्रज्ञ आता सतर्क झाले आहेत.