नवी दिल्ली : कोविड-१९ लसीकरण मोहिमेसाठी मोबाइल तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ही लस लवकरच उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे, असेही त्यांनी सांगितले.चौथ्या ‘इंडिया मोबाइल काँग्रेस’चे (आयएमसी-२०२०) उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केले. त्यावेळी ते बोलत होते. मोदी म्हणाले की, भारतास दूरसंचार उत्पादने, त्यांचे डिझाइन, विकास आणि निर्मिती याचे मोठे केंद्र बनविण्याची सरकारची योजना आहे. येत्या तीन वर्षांत प्रत्येक गाव व खेडे हायस्पीड फायबरने जोेडले जाईल. त्यासाठी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. भारतातील मोबाइल दर सर्वाधिक कमी आहेत. आपला ॲप बाजार सर्वाधिक वेगाने वाढत आहे. मोदी यांनी सांगितले की, ५जी मोबाइल सेवा लवकर सुरू करण्याची गरज आहे. त्यामुळे ‘मल्टी-जीबीपीएस पीक डेटा स्पीड’ उपलब्ध होऊ शकेल. ‘५-जी’साठी ४-जी मजबूत करा - रविशंकर प्रसाद नवी दिल्ली : देशात ५-जी तंत्रज्ञानाची वाट सुकर करण्यासाठी भारतीय कंपन्या व तंत्रज्ञांनी आधी ४-जी व्यवस्था मजबूत करावी, असे आवाहन विधि, दूरसंचार व माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी केले.इंडियामोबाइल काँग्रेसला संबोधित करताना प्रसाद यांनी सांगितले की, आता उपलब्ध असलेली ४-जी तंत्रज्ञान व्यवस्था अधिक मजबूत होणे हे भारतीय सुरक्षेसाठीही महत्त्वाचे आहे. भारताकडे गुणवत्ता आणि नावीन्याची उत्तम ऊर्मी आहे. ५-जी निर्मितीत पुढे जायचे असेल तर ४-जी प्रक्रिया मजबूत होणे अत्यावश्यक आहे, असेही या वेळी म्हणाले
साथीमुळे डिजिटीकरणास गती : मित्तलभारती एअरटेलचे चेअरमन सुनील मित्तल यांनी सांगितले की, कोविड-१९ साथीमुळे देशाच्या डिजिटीकरणास गती मिळाली आहे. विविध उत्पादने आणि सेवा यांच्या डिजिटल पर्यायांची स्वीकारार्हता वाढली आहे. आगामी दोन ते तीन वर्षांत ५जी मोबाइल तंत्रज्ञान सामान्य होईल.
२०२१मध्ये आणणार ५ जी : मुकेश अंबानी२०२१च्या दुसऱ्या सहामाहीत देशात ५जी मोबाइल सेवा सुरू होईल, असे सूतोवाच रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी केले. मोबाइलचे हार्डवेअर उत्पादनही भारतात व्हायला हवे, तसेच अजूनही २जी फोन वापरणाऱ्या ३०० दशलक्ष ग्राहकांच्या हाती स्मार्टफोन देण्यासाठी धोरणात्मक पावले उचलण्याची गरज आहे, असा आग्रह त्यांनी धरला.