नवी दिल्ली : भारताने आजवर कधीच केवळ घृणा वा द्वेषातून कोणत्या देशावर हल्ला केला नाही. पण, देशहिताला बाधा येणार असेल किंवा धोका निर्माण झाला तर धाडसी पाऊल उचलण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी शनिवारी दिला.
पश्चिम बंगालमध्ये सुकना लष्करी केंद्रावर शस्त्रपूजनाच्या वेळी ते बोलत होते. शस्त्रपूजेचे हे अनुष्ठान म्हणजे गरज पडेल तेव्हा शस्त्र व उपकरणांचा पूर्ण शक्तिनिशी वापर करण्यासाठीचे स्पष्ट संकेत असल्याचे राजनाथसिंह म्हणाले. शस्त्रपूजा म्हणजे राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचा रक्षक म्हणून शस्त्रांचे पूजन आणि त्यांचा सन्मान करणे होय, असे ते म्हणाले. सुकमास्थित ३३ कोअरला त्रिशक्ती म्हणूनही ओळखले जाते. सिक्कीम सेक्टरमध्ये चीनलगत असलेल्या प्रत्यक्ष ताबारेषेच्या सुरक्षेची जबाबदारी या सैन्यदलावर आहे.
लष्करी मुख्यालयात शस्त्रपूजन-राजनाथसिंह यांनी सोशल मीडियावर नमूद केले की, ‘भारतात विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन करण्याची मोठी आणि जुनी परंपरा आहे.-आज दार्जिलिंगच्या सुकना भागात ३३-कोअर मुख्यालयात शस्त्रपूजन करण्यात आले.’ यासोबत राजनाथ यांनी एक छायाचित्रही पोस्ट केले. यात लष्करप्रमुख जन. उपेंद्र द्विवेदी, काही वरिष्ठ अधिकारी व जवान दिसत आहेत. -शुक्रवारी गंगटोकमध्ये लष्कराच्या कमांडर्सचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. यात राजनाथसिंह सहभागी होणार होते. परंतु, सिक्कीमची राजधानी गंगटोकमध्ये वाईट हवामानामुळे ते पोहोचू शकले नाहीत. त्यांनी सुकना येथूनच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जवानांशी संवाद साधला.
अरुणाचलमध्ये प्रकल्पांचे उद्घाटनसंरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी शनिवारी सीमा रस्ते संघटनेच्या अरुणाचल प्रदेशातील १८ प्रकल्पांचे उद्घाटन केले. इतर भागांतील ७५ पायाभूत क्षेत्रातील प्रकल्पांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. यात तीन प्रमुख रस्ते मार्ग, १४ पूल आणि एका हेलिपॅडचा समावेश आहे. राज्यपाल के. टी. परनाईक यांनी ईटानगरहून व्हीसीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभाग घेतला. या प्रकल्पांबद्दल अरुणाचलची जनता व केंद्र सरकारचे त्यांनी आभार व्यक्त केले. यावेळी विधि व न्यायमंत्री केंटो जिनी यांनी पश्चिम सियांग जिल्ह्यातील आलो येथे झालेल्या उद्घाटन समारंभात उपस्थिती लावली. राज्यात या प्रकल्पांमुळे संपर्क माध्यमांत सुधारणा होऊन अनेक गावे जोडली जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.