भोपाळ - युवा स्वाभिमान योजना अंतर्गत बेरोजगारांना रोजगार देण्याची नवीन योजना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी काही दिवसांपूर्वी घोषित केली, या योजनेंतर्गत मध्य प्रदेशातील युवकांना विविध रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत त्यामध्ये इलेक्ट्रीशियन, अकाऊंट असिस्टेंट, मोबाईल दुरुस्त करणे, वाहन चालक तसेच जनावरे सांभाळणे या कामांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र काँग्रेस सरकारने आणलेल्या योजनेची भाजपसोबतच नेटीझन्सने मोठ्या प्रमाणात सोशल माध्यमांवर खिल्ली उडवल्याचे पाहायला मिळत आहे.
युवा स्वाभिमान योजनेतंर्गत काँग्रेसकडून गायींचे राजकारण केलं जात आहे असा आरोप विरोधी भाजपकडून केला जात आहे तर काँग्रेसने या योजनेची पाठराखण करत गायी सांभाळणे, त्यांचे संरक्षण करणे हे काम असल्याचे सांगितले. मात्र मोदी सरकारने बेरोजगारांना पकोडे विकण्याचा सल्ला दिला होता तसाच सुशिक्षित बेरोजगारांनी गायी सांभाळणे या कामाचीही खिल्ली नेटीझन्स उडवत आहे.
मध्य प्रदेश काँग्रेस सरकारकडून घोषित केलेल्या या योजनेतंर्गत बेरोजगार युवकांना जनावरे सांभाळण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. नगर विकास विभागाकडून या योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील प्रत्येक जिल्ह्यात जनावरे सांभाळण्यासाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. या योजनेचा टिविट्ररवर नेटीझन्स चांगलाच समाचार घेत आहेत. रितीक म्हणून असणाऱ्या युजरने वडील आणि मुलाच्या संवादाचा जोक्स शेअर करत कमलनाथ यांच्या योजनेची खिल्ली उडवली आहे