नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. मास्क लावण्याचा आवर्जून सल्ला दिला जात आहे. तसेच अनेक ठिकाणी मास्क न लावल्यास दंडाची तरतूद करण्यात आली आहे. मध्य प्रदेशमध्येही कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाच्या संकटात मास्क लावण्याचं आवाहन केलं जात असताना मास्क न लावता भाजपा मंत्र्यांनी कोरोनाला पळवण्यासाठी एक अजब दावा केला आहे.
मध्य प्रदेशच्या पर्यटन मंत्री उषा ठाकूर (Usha Thakur) यांनी कोरोनाला पळवण्यासाठी एक वेगळाच फंडा शोधून काढला आहे. ठाकूर यांनी इंदूरच्या देवी अहिल्याबाई विमानतळावर कोरोना महामारी रोखण्यासाठी अहिल्या देवींच्या प्रतिमेसमोर विशेष पूजा केल्याची घटना समोर आली आहे. या पूजेसाठी विमानतळाच्या संचालक आर्यमा सन्यास यांच्यासहीत संपूर्ण स्टाफही उपस्थित होता. ठाकूर यांनी पूजेदरम्यान त्यांनी टाळ्या वाजवत आराधना केली. मास्क न लावता त्यांनी ही पूजा केली आहे. उषा ठाकूर या अनेकदा सार्वजनिक ठिकाणीही मास्कशिवाय फिरताना दिसतात.
ठाकूर याआधीही मास्क न लावता विधानसभेत पोहोचल्या होत्या. त्यांना यावरून प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी "मी हनुमान चालीसाचे पठण करते. मी रोज शंख फुंकते. काढा पिते. शेणाच्या गोवऱ्यांवर हवन करते. यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. हा माझा कोरोनापासून बचाव आहे" असं म्हटलं होतं. तसेच मी गळ्यात गमछा ठेवते, जर कोणी जवळ आलं तर मी तो तोंडावर ठेवते. जगात ज्याला उत्तम मार्गाने जगायचे आहे त्याने वैदिक जीवनशैली अंगीकारली पाहिजे. त्याला कुठला आजार स्पर्शही करू शकत नाही" असं ठाकूर यांनी म्हटलं होतं.
"भारतीय संस्कृतीनुसार फाटके कपडे घालणं म्हणजे अपशकुन असतो", भाजपा मंत्र्यांचं विधान
उषा ठाकूर यांनी काही दिवसांपूर्वी "फाटके कपडे घालणं हा अपशकुन असतो" असं म्हटलं होतं. संस्कृती आणि परंपरा मानणाऱ्यांना अशापद्धतीचे कपडे परिधान करणं आवडत नाही असंही ठाकूर यांनी म्हटलं. मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळमध्ये एका मुलाखतीदरम्यान त्यांना कपड्यांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना ठाकूर यांनी "माझं व्यक्तीगत मत तर हे आहे की फाटके कपडे घालणं हे भारतीय संस्कृतीप्रमाणे अपशकून मानलं जातं." ठाकूर या भोपाळमधील एका संग्रहालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आल्या होत्या.