नवी दिल्ली- प्रत्येक शुभकार्याची सुरुवात ज्यांच्या सनईनं होते, त्या भारतरत्न उस्ताद बिस्मिल्लाह खान यांना गुगलनं आगळीवेगळी मानवंदना दिली आहे. सर्च इंजिनमध्ये सर्वात पुढे असलेल्या गुगलनं उस्ताद बिस्मिल्लाह खान यांना श्रद्धांजली वाहिली आहे. उस्ताद बिस्मिल्लाह खान यांच्या 102व्या जन्मदिनाच्या निमित्तानं गुगलनं डुडलच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. गुगलच्या होमपेजवरचं हे डुडल चेन्नईचे कलाकार विजय कृष्ण यांनी बनवलं आहे.उस्ताद बिस्मिल्लाह खान यांना कोणत्याही परिचयाची गरज नाही. त्यांनी देश-परदेशात शहनाई वादनाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. गुगल डुडलनं उस्ताद बिस्मिल्लाह खान यांना पांढ-याशुभ्र रंगाच्या पोशाखात शहनाई वाजवताना दाखवलं आहे. एका अनोख्या पद्धतीनं गुगलनं हे डुडल बनवलं आहे.या डुडलमध्ये त्यांच्या शहनाईतून धून निघत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. ज्याला देशभरातून ऐकता येऊ शकतं आहे. उस्ताद बिस्मिल्लाह खान यांचा जन्म 12 मार्च 1916 रोजी झाला होता. त्यांच्या नावामागेसुद्धा एक वेगळी गोष्ट आहे. असं म्हणतात, त्यांच्या जन्मावेळी त्यांच्या आजोबांनी अल्लाहचे आभार मानताना बिस्मिल्लाह असं म्हटलं. त्यामुळेच त्यांचं नाव बिस्मिल्लाह पडलं. फार कमी वयात त्यांनी ठुमरी, छैती, कजरी आणि स्वानी अशा भिन्न शैली त्यांनी आत्मसात केले होते. त्यानंतर त्यांनी संगीताचेही धडे गिरवले आणि अनेक रागांमध्ये प्रावीण्य संपादन केलं. 2001मध्ये त्यांना सर्वोच्च पुरस्कार भारतरत्ननंही सन्मानित करण्यात आलं आहे. तर 1968मध्ये त्यांना पद्मभूषण, 1980मध्ये पद्मविभूषण आणि 1961मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.
उस्ताद बिस्मिल्लाह खान यांना गुगलची आगळीवेगळी श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2018 11:12 AM