काही माणसे अशी असतात की, ती कधी आपल्यातून जाऊच नये, काही झाले तरी ती कायम असावीत, असेच वाटत राहते. त्यांचा आणि आपला वास्तविक संबंध काही नसतो. परंतु, ते केवळ आहेत यातच आपण आपल्या मनाचे समाधान करून घेत असतो. यातील एक नाव म्हणजे उस्ताद झाकीर हुसेन. लय, ताल यांवर हुकुमत असणारे उत्तुंग व्यक्तिमत्त्व. त्यांच्या निधनाचे वृत्त अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवणारे असेच होते.
झाकीर हुसेन कालवश झाल्याचे समजताच अनेकांनी लेखणीचा कुंचला घेऊन आपापले अनुभव, किस्से, काव्य यांचे पेशकारे सोशल मीडियावर टाकायला सुरुवात केली. माणूस गेल्यावर त्याची किंमत कळते, मोठेपण जाणवते, हिमालयाएवढे असणारे कर्तृत्व नजरेसमोर उभे राहते. भारतीय संगीत विश्वातील या माणसाबाबत जेवढे लिहावे, सांगावे तेवढे कमीच आहे; पण, या माणसाकडून घेण्यासारखे पुष्कळ आहे. अगदी कालातीत.
'सर्जनशील' साथीदार ते 'शक्ती बँड'चे संस्थापक
उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च १९५१ रोजी मुंबईत झाला. झाकीर हुसेन यांचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील माहीम येथील सेंट मायकल स्कूलमधून झाले. याशिवाय त्यांनी मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केले. त्यांचे वडील उस्ताद अल्लारखा यांच्याकडेच त्यांनी वयाच्या चौथ्या वर्षापासून तबल्याचे धडे गिरवले. कौशल्यपूर्ण वादनाने आणि बुद्धिमत्तेमुळे ते भारतीय शास्त्रीय संगीतातल्या वादकांसाठी एक ‘सर्जनशील’ साथीदार होते. याबरोबरच झाकीर यांनी जाझ आणि जागतिक संगीतातही आपला ठसा उमटवला. त्यांनी अनेक प्रसिद्ध वादकांसोबत जगभरात कार्यक्रम केले तसेच एकलवादनही केले. जॉन मॅक्लॉफ्लिन, एल. शंकर आणि टी.एच. विनायकराम यांच्याबरोबर त्यांनी ‘शक्ती बँड’ स्थापन करून संगीत क्षेत्रात इतिहास रचला. त्यांनी जगविख्यात दिग्दर्शकांच्या चित्रपटांसाठी पार्श्वसंगीत दिले, तसेच काही चित्रपटांत अभिनयही केला. उस्ताद झाकीर हुसेन यांना १९८८मध्ये पद्मश्री, २००२ मध्ये पद्मभूषण आणि २०२३ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. झाकीर हुसैन यांना तीन ग्रॅमी पुरस्कारही मिळाले होते. झाकीर हुसैन भारतीय गुरु-शिष्य परंपरेतील सर'ताज' होते, कुठलाही राग, रिदम, ताल, तिहाई, चलन, छंद यांवर झाकीर भाईंची सत्ता होती. उस्ताद झाकीर भाई सरस्वतीपुत्र, भारतीय गुरु-शिष्य परंपरेचे, भारतीय संस्कृतीचे प्रवर्तक आणि प्रचारक होते. तबल्यातून डमरूचा नाद, रेल्वे ट्रॅकचा आवाज आणि अनेक अकल्पनीय गोष्टी प्रत्यक्षात बोटातून उमटवून दाखवणारे लय, ताल आणि मात्रांचा अनभिषिक्त सम्राट होते.
तबला म्हणजे केवळ आणि केवळ उस्ताद झाकीर भाई
वास्तविक पाहता तबला हे गायकाने, वादकाने किंवा शास्त्रीय नृत्य सादर करणाऱ्या कलाकाराने घेतलेले एक तालवाद्य. परंतु, तबला या वाद्याला जगभरात आदराचे, सन्मानाचे स्थान मिळवून देण्यात झाकीर भाईंचा मोठा वाटा आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत वादनाच्या क्षेत्रात अनेक थोर कलाकार होऊन गेले. दिग्गज तबलावादकही होऊन गेले. लय, ताल आणि मात्रा यांच्या दुनियेत आपल्याला हवे तसे फिरणारे आणि आपल्यासोबत रसिकांना, श्रोत्यांना आणि जाणकारांना डोलायला लावणाऱ्या दिग्गजांची संख्या मोठी आहे. पण, या सगळ्याचा कळस ठरले ते म्हणजे, उस्ताद झाकीर हुसैन. तबला म्हणजे केवळ आणि केवळ झाकीर भाईच, असे एक समीकरणच बनले होते. उस्तादजी असंख्य कलाकार, वादक यांची प्रेरणा झाले. झाकीर भाईंचा तबला केवळ वाजत नव्हता, तर तो श्रोत्यांशी आणि रसिकांशी संवाद साधत होता. या हृदयीचे ते त्या हृदयी आपसुकच नकळतपणे पोहोचवत होता. तबल्यातील काहीच न कळणाऱ्यांनाही उस्तादजींनी आपल्या लयीवर आणि लयकारीवर बागडायला लावले. उस्ताद झाकीर हुसैन ज्या काळात घडले, तो काळ म्हणजे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा अगदी सुवर्णकाळच. या सुवर्णकाळातील अस्सल हिऱ्यांचा सहवास उस्ताद झाकीर हुसेन यांना लाभला. खरी गायकी, वादन, गुरुपरंपरा, शिकवण आणि सादरीकरण. झाकीर हुसैन यांनी साथसंगत केलेल्या कलाकारांची नावे जरी नजरेखालून घातली, तरी साथ करताना झाकीर हुसेन यांनी नेमके काय कमावले, याची जाणीव होते.
कलाकाराने कसे घडावे याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे झाकीर भाई
झाकीर हुसेन यांनी वयाच्या सातव्या वर्षी पहिली मैफल सादर केली. त्या मैफिलीने झाकीर तबलावादन आणि संगीत क्षेत्रातील सर्वोच्च कलाकार होणार असल्याचे शिक्कामोर्तब केले. उस्ताद झाकीर हुसेन अगदी वयाच्या १२ ते १३ वर्षांपासून जाहीर कार्यक्रम करायला सुरुवात केली. तत्पूर्वी वडील अल्लारखा यांच्याकडे तबलावादनाचे धडे गिरवले. संगीत क्षेत्रात रियाज या गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व असते. रियाज कसा असतो आणि तो कसा असावा याचे आदर्श उदाहरण म्हणजे झाकीर भाई. आपल्या शिकवणीविषयी बोलताना झाकीर भाई सांगायचे की, निव्वळ अल्लारखा यांचा मुलगा म्हणून मी त्यांचा शिष्य बनलो नाही की, त्यांनी मला त्यांचा गंडा बांधला नाही. वयाच्या सातव्या वर्षांपासून तर वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत वेड्यासारखा माझ्या वडिलांकडून शिकत होतो. रोज रात्री दहा ते पहाटे पाच-साडे पाच कधी कधी सहापर्यंत शिकवणी असायची! सगळे म्हणतात उत्तम गुरु उत्तम शिकवणी देतो, माझ्या मते गुरु कधीही शिकवत नाही, हात धरून तर अजिबातच नाही, तो फक्त शिष्याला उत्तम ग्रहण करणे शिकवतो. त्यानंतर उत्तम शिष्य होण्याची जबाबदारी त्या शिष्याचीच असते, आणि ते शिष्य किती टिपून घेतो ह्यावर ते ठरते! गुरु तर नदीच्या प्रवाहासारखा असतो, त्या गुरुरूपी नदीतून तुम्ही चहाचा कप टाकून पाणी काढताय, हंडा टाकून पाणी काढताय की बादली टाकून पाणी काढताय हे ज्याचे त्याने आपापल्या कुवतीनुसार ठरवावे! रियाज भक्कम असेल, तरच झाकीर भाईंसारखे उस्ताद होता येते, हे त्यांनी स्वतःच्या उदाहरणातून दाखवून दिले.
सर्व प्रकारच्या कलाकारांबरोबर आणि कला-प्रकारांबरोबर तबलावादन
वयाच्या १२ - १३ व्या वर्षांपासूनच झाकीर भाई प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले होते. त्या वर्षापासून सुरू केलेला लयकारीचा प्रवास हा वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांच्या श्वासासोबतच थांबला. लाखो मैफिली, हजारो दौरे आणि असंख्य श्रोत्यांच्या मिळणाऱ्या प्रेमाने झाकीर भाई कधीही हवेत गेले नाही. यशाच्या हिमालयापर्यंत पोहोचल्यावरही जमिनीवर कसे राहावे, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे झाकीर भाई होते. सोलो वादन, फ्युजन आणि साथसंगत हे तिन्ही प्रकार तितक्याच तन्मयतेने सादर करीत असत. झाकीर हुसेन हे असे एकमेव तबलावादक आहेत, की ज्यांनी सर्व प्रकारच्या कलाकारांबरोबर आणि कला-प्रकारांबरोबर तबलावादन केले. मग तो गिरीजा देवी यांचा टप्पा असो, किंवा त्यांचीच ठुमरी किंवा झुला असो; किंवा मग भीमसेन जोशी यांचा अभंग असो किंवा पंडित जसराज यांचे भजन असो. हे सारे प्रकार आत्मसात करून त्यांनी या सर्वांबरोबर वादन केले. किराणा, लखनवी, जयपूर, दिल्ली, वाराणसी, अशा हिंदुस्थानी शास्त्रीय, घराण्यातील गायकांना, तसेच कर्नाटकी शास्त्रीय घराण्यातील अनेक दिग्गज कलाकारांना तबल्यावर साथ केली. किशोरीताई आमोणकर, सितारादेवी, वसंतराव देशपांडे, बडे गुलाम अली खान, रविशंकर, शिवकुमार शर्मा, जितेंद्र अभिषेकी बुवा, अमजद अली खान, हरिप्रसाद चौरसिया, नुसरत फतेह अली खान, निलाद्रीजी, शिवमणी, शंकर महादेवन आजच्या पिढीतील राहुल देशपांडे, महेश काळे, प्रथमेश लघाटेंपर्यंत अनेक नावे घेता येतील, या सगळ्यांबरोबर तितक्याच नम्रपणे साथ केली.
कलाकाराने कसे असावे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे झाकीर भाई
झाकीर हुसैन यांच्याकडून घेण्यासारख्या प्रचंड गोष्टी आहेत. सर्वप्रथम म्हणजे आपल्या वाद्यावर प्रेम करणे, त्याला जपणे. कार्यक्रमाला गेल्यावर रंगमंचावर जाताना ते स्वतःचा तबला स्वतः घेऊन जायचे. कार्यक्रम झाल्यावर स्वतः तो नीट ठेवायचे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निरीक्षण. केवळ एक कार्यक्रम आहे, वादन केले किंवा साथ केली आणि घरी गेले, असे नाही. गायक काय गातोय, कसे गातोय, कशा प्रकारे सादरीकरण करतोय, लयकारी कशी करतोय, ठेहराव कसा आहे, अशा एक ना अनेक गोष्टींचे निरीक्षण करून झाकीर भाईंनी स्वतःमध्ये बदल केले, घडवले, सुधारणा केल्या. तबला वादकाला गाता आले पाहिजे आणि गायकाला तबला वाजवता आला पाहिजे, असे त्यांचे मत होते. अनेक गायकांचे उदाहरण देऊन त्यांना तबला येत होता, लयीचे चांगले अंग होते, म्हणून ते कलाकार सर्वोच्चपदाला जाऊन पोहोचले, असे उस्तादजी नेहमी सांगायचे. साथ करताना ती डोळसपणे केली. तबला, त्यातील कायदे, मात्रा, ताल, लय, नाद या सगळ्या गोष्टी झाकीर भाई कोळून प्यायले होते. तबल्यातील एक कायदा, पलटा किंवा बोल याचा दृष्टिकोन किती वेगळा असू शकतो, ते तुम्ही किती वेगळ्या पद्धतीने पाहू शकता आणि रसिकांना दाखवू शकता, याबाबत ते मार्मिक शब्दांत मार्गदर्शन करायचे. केवळ सांगायचे नाही, तर प्रत्यक्ष वाजवून सोदाहरण समजावून सांगायचे. झाकीर भाईंच्या अंगात आणि नसानसात लय भिनलेली होती. त्यामुळेच कोणताही ताल, कोणत्याही पटीत आणि कोणत्याही प्रकारे लीलया खुलवून दाखवायचे. कोणत्याही गायक-वादकासोबत तितक्याच साधेपणाने साथ करायचे, कोणताही बडेजाव कधी केला नाही. आपण ज्याला साथ करतोय, त्याकडून काही घेता कसे येईल, याकडे त्यांचा कटाक्ष राहिल्याचे त्यांच्या वागण्या-बोलण्यातून दिसून यायचे. एखाद्या कार्यक्रमाला जाताना लोकल ट्रेन, बसनेही जायचे. साधेपणाने, नम्रपणाने सगळ्यांची बोलायचे. मोठ्यांचा आदर करायचे, मग तो कलाकार असो किंवा मग कोणाच्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती. वयाने आणि मानाने मोठे आहेत म्हटल्यावर झाकीर भाई अदबीने बोलत आणि वागत असत.
मला झाकीर हुसेन व्हायचे आहे...
झाकीर भाई सामान्य श्रोत्यांसाठी निखळ आनंदाचा अखंड वाहणारा झरा होते, लयकारीची दिव्य अनुभूती देणारे कलाकार होते, तर जाणकार, तज्ज्ञ व्यक्तींसाठी तबल्याचे ज्ञानपीठ होते. ज्यांनी ज्यांनी उस्ताद झाकीर हुसेन यांना प्रत्यक्ष ऐकले, अनुभवले, सहवास लाभला, त्यांच्या इतके भाग्यवान आज दुसरे कुणीही नाही. तबला वाजवणाऱ्यांसाठी, शिकणाऱ्यांसाठी देव होते. जसे क्रिकेट म्हटले की, सचिन तेंडुलकर होण्याचे स्वप्न असते, पार्श्वगायन प्रकारात लता मंगेशकर होण्याचे स्वप्न असते, अभिनयात बीग बी अमिताभ बच्चन होण्याचे स्वप्न असते, तसे तबला वादन म्हटले की, उस्ताद झाकीर हुसेन होण्याचे स्वप्न असते. झाकीर हुसेन होणे ही सोपी गोष्ट नाही. रियाज, तबल्यावरील प्रेम, तबल्याबाबत कळकळ, तबल्यावर निस्सीम श्रद्धा, वादनावरील आस्था अशा अनेक गोष्टींचे अजब रसायन झाकीर भाई होते. एक व्यक्ती म्हणून, कलाकार म्हणून त्यांचे गुण घेतले आणि ते आत्मसात करण्याचा नम्र, प्रामाणिक प्रयत्न केला, तर तीच खरी उस्ताद झाकीर हुसेन यांना खरी आदरांजली ठरेल...!!!
जाता जाता: गवाक्षातून पाहिल्यास स्वर्गात गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्यापासून ते अगदी बिरजू महाराज, शिवकुमार शर्मा यांच्यापर्यंत अनेक दिग्गज मंडळी झाकीर हुसेन यांच्या स्वागताला द्वारापाशी येऊन थांबली असतील. गंधर्वांच्या दिव्य दुनियेत या सगळ्या कलाकारांची एक अद्भूत मैफिल सुरू होईल, कधीही न थांबणारी...
- देवेश फडके.