प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) चे शास्त्रज्ञ उथैया कुमार यांनी ७ वर्षांनंतर नोकरी सोडली आणि कॅब सर्व्हिस स्टार्ट-अप सुरू केलं. या व्यवसायातून आता वर्षाला २ कोटींची कमाई होत आहे. त्याच्या या प्रेरणादायी प्रवासाचे सोशल मीडियावर भरभरून कौतुक होत आहे.
उथैया कुमार हे कन्याकुमारी जिल्ह्यातील एका छोट्या गावातून आले आहेत. इस्रोमध्ये रुजू होण्यापूर्वी त्यांनी एमफिल डिग्री घेतली आणि पीएचडीही पूर्ण केली. इस्रोमधून नोकरी सोडल्यानंतर उथैया कुमार यांनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असिस्टेंट प्रोफेसर म्हणूनही काम केलं.
२०१७ मध्ये उथैया कुमार यांची दुसरी इनिंग सुरू झाली, जेव्हा काही मित्रांनी उथैया यांना एसटी कॅब सुरू करण्यासाठी पैसे उभारण्यास मदत केली. आई-वडील सुकुमारन आणि तुलसी यांच्या नावावरून त्यांनी एसटी कॅब्स कंपनीचं नाव ठेवलं. लिंक्डइनवर याबाबत एक पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टनुसार, उथैया यांच्याकडे आता ३७ गाड्या आहेत, ते आपल्या भावासह हे सर्व मॅनेजमेंट पाहतात. सध्या या स्टार्टअपमधून दरवर्षी २ कोटी रुपये कमावतात.
उथैया कुमार हे टॅक्सी चालकांना आपला बिझनेस पार्टनर मानतात. तसेच त्यांना ३०% वाटा मिळेल याची खात्री करतात. त्याच वेळी, जर कर्मचाऱ्यांनी नवीन कार जोडली तर त्यांना कमाईतून ७०% वाटा मिळतो. हा अनोखा दृष्टीकोन चालकांना अधिक ग्राहक आकर्षित करण्यासाठी आणि कंपनीच्या यशात हातभार लावण्यासाठी प्रेरित करतो. उथैया कुमार आपल्या कर्मचाऱ्यांसाठी घरांची सुविधा निर्माण करण्यासाठी पैसे वाचवतात. तसेच आपल्या गावच्या चार मुलांच्या शिक्षणाचा खर्चही उचलतात.