नवी दिल्ली, दि. 20 - शनिवारी सायंकाळी उत्तर प्रदेशात मुज्जफरनगरजवळ खतौली येथे पुरी-हरिद्वार कलिंग उत्कल एक्स्प्रेसला झालेला अपघात अभियांत्रिकी विभागाच्या चुकीमुळे झाल्याचा प्रथमदर्शनी निष्कर्ष उत्तर रेल्वे प्रशासनाने काढला असून, वरिष्ठ विभागीय अभियंत्यासह अभियांत्रिकी विभागातील चौघांना निलंबित करण्यात आले आहे. तर उत्तर रेल्वेच्या व्यवस्थापकांसह 8 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तीन जणांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे, तर एका अधिका-याची बदली करण्यात आली आहे. एरव्ही काहीही झाले तरी शांत असणारे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू या अपघाताने खूपच चिंतित झालेले जाणवले. त्यांनी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष ए. के. मित्तल यांना आजच्या आज प्रथमदर्शनी माहितीच्या आधारे अपघाताचे कारण निश्चित करा, असा आदेश दिला होता. त्यानंतर लगेच यंत्रणा कामाला लागली. सायंकाळी उत्तर रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी विभागीय वरिष्ठ अभियंत्यांसह त्यांच्या विभागातील तिघांचे निलंबनाचे आदेश काढले.जेथे अपघात झाले तेथे रेल्वेरुळांचे दुरुस्तीचे काम सुरू होते. वाहतूक सुरू असताना असे काम करायचे असेल तर कामाच्या ठिकाणाच्या ब-याच आधी लाल झेंडे लावून त्यांची पूर्वसूचना देणे बंधनकारक असते. प्राथमिक चौकशीत असे आढळले की, अपघात झाले तेथे असे झेंडे लावलेले नव्हते. परिणामी ताशी १०५ किमी वेगाने धावणा-या उत्कल एक्प्रेसच्या ड्रायव्हरला आगाऊ सूचना न मिळाल्याने भरधाव गाडीला त्याला आयत्या वेळी ब्रेक लावावे लागले. परिणामी १४ डबे रुळांवरून घसरले व काही वेगामुळे एकमेकांवर चढले. हा चुकीसाठी अभियांत्रिकी विभागास प्रथमदशर्शनी जबाबदार धरण्यात आले, असे सूत्रांनी सांगितले. रेल्वे बोर्डाचे सदस्य मोहम्मद जमशेद (वाहतूक) यांनी दिवसभर घटनास्थळी हजर राहून खोळंबलेली वाहतूक लवकरात लवकर सुरु होण्याच्या दृष्टीने काम करून घेतले.दरम्यान, मुजप्फरनगर येथील शवागारात २३ मृतांशी ओळख पटवून मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईकांनी दिवसभर गर्दी केली. रेल्वे आणि उत्तर प्रदेश सरकारकडून जाहीर झालेले सानुग्रहअनुदान त्यांना तेथेच वितरित करण्याची व्यवस्था केली गेली. ५० जखमींना उपचारांनंतर सोडण्यात आले. अजूनही १०२ जखमी उपचार घेत आहेत.
उत्कल एक्स्प्रेस अपघात अभियांत्रिकी चुकीमुळे?, उत्तर रेल्वेच्या व्यवस्थापकांसह 8 जणांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2017 9:32 PM