हापूड : उत्तर प्रदेशातील हापुड जिल्ह्यातल्या धोलाना गावी औद्योगिक वसाहतीत एका कंपनीतील बॉयलरचा स्फोट होऊन त्या दुर्घटनेत १२ कामगार ठार व १९ जण जखमी झाले. शनिवारी दुपारी घडलेल्या या अपघातातील जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असून त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
बॉयलरचा स्फोट झाला त्यावेळी या कंपनीमध्ये अनेक कामगार होते. हा स्फोट इतका मोठा होता की, त्यामुळे कारखान्याची इमारत व तिच्या छताचे प्रचंड नुकसान झाले. तसेच आजूबाजूला असलेल्या कारखान्यांच्या इमारतींचीही हानी झाली आहे. हापूडच्या जिल्हाधिकारी मेधा रुपम यांनी सांगितले की, जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या कारखान्याला लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांनी काही तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर विझविली. स्फोट नेमका कोणत्या कारणांमुळे झाला याचा उलगडा करण्याबरोबरच या औद्योगिक वसाहतीतील सर्व कारखान्यांची सुरक्षाविषयक तपासणी करावी अशी मागणी या अपघाताच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी उत्तर प्रदेश सरकारकडे केली आहे. (वृत्तसंस्था)
चौकशीचे आदेशउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ यांनी बॉयलर दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच अपघातातील जखमींना व मरण पावलेल्यांच्या वारसदारांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही योगी आदित्यनाथ यांनी दिले आहे.