ऑनलाइन लोकमत
लखनू, दि. १९ - दाट धुक्यामुळे स्कूल बस आणि ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघातात २५ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. इटा जिल्ह्यातील अलीगंज येथे आज सकाळ हा अपघात झाला असून सुमारे ४० जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
जे. एस. विद्या शाळेची बस ५० विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना हा अपघात झाला. धुक्यामुळे बस चालकाला समोरचा अंदाज आला नाही आणि बस ट्रकवर जाऊन आदळली. ‘अपघातानंतर बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचे काम प्राधान्याने सुरू आहे. अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल केले जात आहे,’ अशी माहिती उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक जावेद अहमद यांनी दिली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये कडाक्याची थंडी पडली असून अनेक भागात मोठ्या प्रमाणात धुके असल्याने दृष्यमानतेतही घट झाली आहे. यामुळे स्थानिक प्रशासनाने सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली होती. मात्र तरीही जे. एस. विद्या शाळा प्रशासनाने शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. जर शाळा बंद ठेवली असती तर आजचा हा अपघात टळला असता व त्या निष्पाप मुलांचे जीव वाचले असते, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
Holidays were declared from Jan 18th till Jan 21st, will take action against those responsible: Etah District Magistrate Shambhunath Yadav— ANI UP (@ANINewsUP) 19 January 2017
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या अपघाताबदद्ल दु:ख व्यक्त केले आहे.
Anguished by the tragic accident in UP’s Etah district. I share the pain of the bereaved families & condole passing away of young children.— Narendra Modi (@narendramodi) 19 January 2017