लखीमपूर खेरी - लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri) येथील हिंसाचारात मरण पावलेल्या शेतकऱ्यांना 45 लाख आणि जखमींना 10 लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. तसेच उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होईल, अशी माहिती एडीजी कायदा आणि सुव्यवस्था प्रशांत कुमार (Prashant Kumar) यांनी दिली. (Uttar Pradesh 45 lakhs and a govt job to the families of 4 farmers died in lakhimpur kheri, retired HC judge will probe the matter)
प्रशांत कुमार म्हणाले, "काल लखीमपूर खेरी येथे मारल्या गेलेल्या 4 शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना सरकार 45 लाख रुपये आणि एक सरकारी नोकरी देईल. तर, जखमींना 10 लाख रुपयांची मदत केली जाईल. शेतकऱ्यांच्या तक्रारीच्या आधारे एफआयआर नोंदवला जाईल. तसेच उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश या प्रकरणाची चौकशी करतील. एवढेच नाही, तर सीआरपीसीचे कलम 144 लागू असल्याने राजकीय पक्षांच्या नेत्यांना जिल्ह्या दौऱ्याची परवानगी देण्यात आली नाही. मात्र, शेतकरी संघटनांच्या सदस्यांना येथे येण्यास परवानगी आहे, असेही प्रशांत कुमार म्हणाले.
हिंसाचारासाठी अजय मिश्रा यांनी राकेश टिकैत यांना ठरवलं जबाबदार -केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांनी लखीमपूर हिंसाचारासाठी भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत यांना जबाबदार ठरवले आहे. मिश्रा म्हणाले, मी आणि माझा मुलगा त्यावेळी घटना स्थळी उपस्थित नव्हतो. या प्रकरणाची न्ययालयीन चौकशी व्हायला हवी. सत्य सर्वांसमोर येईलच. तसेच, 'हिंसाचारात आमच्या कार्यकर्त्यांचाही मृत्यू झाला आहे. त्यांनाही भरपाई मिळायला हवी. या घटनेसंदर्भात आम्हीही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत चर्चा केली आहे. जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी,' असेही मिश्रा म्हणाले.