केंद्रातील मोदी सरकारने मुलींच्या लग्नाचे किमान वय पुरुषांच्या बरोबरीने म्हणजेच 18 वरून 21 वर्षे करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर आता एआयएमआयएमचे प्रमुख असुदुद्दीन ओवेसी यांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ओवेसी म्हणाले, 'आता केंद्राने महिलांसाठी लग्नाचे कायदेशीर वय 21 वर्षे केले आहे. कायद्यानुसार 18 वर्ष वय असताना तुम्ही महिलेसोबत लैंगिक संबंध ठेऊ शकता, पण 18 व्या वर्षी तिच्याशी लग्न करू शकत नाही? लग्नासंदर्भात मोदींना काय समस्या? आता भाजप म्हणेल ओवेसी आणि मुस्लीम महिलांच्या हितासंदर्भात बोलत नाहीत. मोदीजी, तुम्ही आमचे काका कधी झाले? काका फक्त बसून प्रश्न विचारतात, आता काका म्हणतायत लग्न करू नका.'
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर, AIMIM प्रमुख असुदुद्दीन ओवेसी मिरत येथे जाहीर सभेला संबोधित करत होतो. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर हल्ला चढवला. एवढेच नाही, तर त्यांनी पंतप्रधान मोदींवरही जोरदार टीका केली. जाहीर सभेला संबोधित करताना ओवेसी म्हणाले, मी तुम्हा सर्वांना आवाहन करण्यासाठी आलो आहे, यूपीमधील 19 टक्के मुस्लिमांना त्यांची राजकीय ताकद, नेतृत्व आणि भागीदारीची गरज आहे, जेणेकरून आपल्या तरुणांना सन्मान, शिक्षण मिळेल आणि अत्याचार, भेदभाव दूर करता येईल. एवढेच नाही, तर मुस्लीम कधी जागे होणार? असा सवालही त्यांनी यावेळी केला.
लखीमपूर खेरी घटनेचा संदर्भ देत ओवेसी म्हणाले, केंद्र सरकारमधील गृह राज्यमंत्री टेनी यांनी कट रचला आणि परिणामी त्यांच्या मुलाने चार शेतकर्यांची हत्या केली. यानंतर पीएम मोदी टेनी यांना सरकारमधून काढून टाकत नाहीत. जातीवादाचा आरोप करत ओवेसी म्हणाले, टेनी हे उत्तर प्रदेशातील ब्राह्मण आहेत, यामुळे ते ब्राह्मण समाजाला दुखावू इच्छीत नाहीत.
शाहजहांपूरमध्ये गंगा एक्सप्रेस वेच्या पायाभरणीसाठी आलेल्या पंतप्रधान मोदींवरही ओवेसींनी निशाणा साधला. ओवेसी म्हणाले, पीएम मोदी म्हणाले की, गंगा एक्सप्रेस वेचा सर्वांना फायदा होईल. नरेंद्र मोदीजी मिरत शहरातील वाहतूक समस्या सोडवू शकले नाही, ते गंगा एक्सप्रेस वे बांधणार.