ज्ञानवापी मशिदीच्या सर्व्हेवरून निर्माण झालेल्या कायदेशीर वादानंतर, आता या मुद्द्यावरून राजकीय वातावरणही तापताना दिसत आहे. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसींसारख्या नेत्यांनी हिंदू पक्षाचा दावा आधीच फेटाळून लावला आहे. यातच, आता या वादावर सपाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांनीही प्रतिक्रिया देत भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. महत्त्वाच्या मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठी, असे मुद्दे उपस्थित केले जात असल्याचे अखिलेश यांनी म्हटले आहे.
'भाजपकडे द्वेशाचे कॅलेंडर' -अखिलेश यादव म्हणाले, भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांकडून जाणूनबुजून ज्ञानवापीसारखे मुद्दे उपस्थित केले जात आहेत. आज तेल आणि खाद्यपदार्थ प्रचंड महाग झाले आहेत. वाढती महागाई आणि बेरोजगारीसंदर्भात भाजपकडे उत्तर नाही. एवढेच नाही तर, भाजपकडे असे द्वेषाचे कॅलेंडर आहे. असे मुद्दे ते निवडणुका येईपर्यंत सातत्याने काढत राहतील, असा दावाही अखिलेश यांनी केला.
खासगीकरणावर प्रश्न उपस्थित करत अखिलेश म्हणाले, आज देशाची संपत्ती विकली जात आहे. भाजप 'वन नेशन, वन रेशन'ची घोषणा देते. मात्र, 'वन नेशन, वन बिझनेसमन' वर काम करताना दिसत आहे. अखिलेश यांच्या शिवाय, इतरही अनेक विरोधी पक्ष नेत्यांनी ज्ञानवापी सर्व्हे हा राजकीय पाऊल असल्याचे म्हणत भाजपवर निशाणा साधला आहे.
तत्पूर्वी, ज्ञानवापी मशिदीसंदर्भातील वादावर सुनावणी करताना आज सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला आदेश देत, ज्या ठिकाणी 'शिवलिंग' आढळून आले, ते ठिकाण सील करण्यात यावे आणि त्याला संपूर्ण सुरक्षा देण्यात यावी. तसेच, नमाजमध्येही व्यत्यय येऊ नये, असे म्हटले आहे.