लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय ठरलेल्या उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या ९ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. या नऊ जागांपैकी सहा जागांवर भाजपानं बाजी मारली आहे. तर एक जागा भाजपाचा मित्रपक्ष आरएलडीने जिंकलीआहे. तर लोकसभा निवडणुकीत भाजपाला धोबीपछाड देणाऱ्या समाजवादी पक्षाला केवळ २ जागांवर समाधान मानावं लागलं आहे.
उत्तर प्रदेशमधील मीरपूर, कुंदरकी, गाझियाबाद सदर, खैर, कटेहरी, फूलपूर, करहल, मझवां आणि सीसामऊ विधानसभा मतदारसंघात झालेल्या या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी आज सकाळी सुरू झाली. सुरुवातीला अटीतटीच्या वाटत असलेल्या या मतमोजणीत भाजपा आणि मित्रपक्षांना पुढे आघाडी घेतली. या नऊ जागांपैकी कुंदरकी, गाझियाबाद, खैर, कटेहरी, फुलपूर आणि मझवां या जागांवर भाजपानं बाजी मारली आहे. तर मीरपूरमध्ये भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या आरएलडीच्या उमेदवारानं विजय मिळवला आहे.
तर लोकसभा निवडणुकी जोरदार कामगिरी करणाऱ्या इंडिया आघाडीमधील प्रमुख पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाला या निवडणुकीत अपयशाचा सामना करावा लागला. अखिलेश यादव कुटुंबीयांची परंपरागत जागा असलेल्या करहल आणि सीसामऊ या दोन जागांवर समावादी पक्षाला विजय मिळाला.
या पोटनिवडणुकीत भाजपाच्या विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये कुंदरकीमधून भाजपाचे रामवीर सिंह, गाझियाबादमधून भाजपाचे संजीव शर्मा, खैरमधून भाजपाचे सुरिंदर दिलेर, फूलपूरमधून भाजपाचे दीपक पटेल, कटेहरीमधून भाजपाचे धर्मराज निषाद आणि मझवांमधून सुश्मिता मौर्या यांनी विजय मिळवला आहे. तर मीरपूरमध्ये भाजपाचा मित्रपक्ष रालोदचे मिथिलेश पाल हे विजयी झाले. समाजवादी पक्षाला विजय मिळालेल्या दोन जागांपैकी करहलमधून तेजप्रताप सिंह आणि सीसामाऊमधून नसीम सोलंकी यांनी विजय मिळवला आहे.