महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीबरोबरच उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या नऊ जागांसाठी होत असलेली पोटनिवडणूक ही राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये अनपेक्षित अशी पीछेहाट झाल्याने भाजपाला लोकसभेत बहुमताचा टप्पा ओलांडता आला नव्हता. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या पराभवामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. तर अखिलेश यादव यांची इंडिया आघाडीत राष्ट्रीय नेते म्हणून प्रतिमा प्रस्थापित झाली होती. अशा परिस्थितीत आता विधानसभेच्या नऊ जागांसाठी होत असलेली पोटनिवडणूक ही योगी आदित्यनाथ यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. तसेच सद्यस्थितीत या नऊ जागांवर अटीतटीचा सामना होत असल्याचे संकेत मिळत आहेत.
उत्तर प्रदेशमधील मीरपूर, कुंदरकी, सदर, खैर, कटेहरी, फूलपूर, करहल, मझवां आणि सीसामऊ विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या या पोटनिवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्या इंडिया आघाडीमध्ये मुख्य लढत होत आहे. त्याशिवाय बसपा आणि चंद्रशेखर यांनीही आपापले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.
पोटनिवडणूक होत असलेल्या नऊपैकी सहा विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपाचं पारडं जड असल्याचं सांगण्यात येत आहे. तर करहल विधानसभा मतदारसंघात समाजवादी पार्टीचं पारडं जड असल्याचं दिसत आहे. सीसामऊ आणि कुंदरकी विधानसभा मतदारसंघात अटीतटीची लढत असल्याचे संकेत मिळत आहेत.
२०२२च्या विधानसभा निवडणुकीत सदर, खैर, मझवां, फूलपूर मतदारसंघात भाजपाला विजय मिळाला होता. तर करहल, कुंदरकी आणि सीसामऊ मतदारसंघात समाजवादी पक्षाचे उमेदवार विजयी झाले होते. दरम्यान, सध्याची राजकीय आणि जातीय समीकरणे पाहता सदर, खैर, फूलपूर, मझवां आणि कटेहरी मतदारसंघात भाजपाचे उमेदवार विजयी होऊ शकतात. तर मीरपूरमध्ये राष्ट्रीय लोकदल पक्षाला विजय मिळू शकतो. तर करहलमध्ये समाजवादी पक्षाचे तेजप्रताप यादव विजयी होण्याची शक्यता अधिक आहे. तर सीसामऊ आणि कुंदरकी विधानसभा मतदारसंघात अटीतटीची लढत दिसत आहे.