उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा (Uttar Pradesh Assembly Elections) कार्यक्रम आटोपून दिल्लीला निघालेले AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या गाडीवर गोळीबार झाला आहे. त्यांच्या गाडीवर तीन-चार राऊंड फायर झाले. स्वत: असदुद्दीन ओवेसी यांनीच ट्विट करून गाडीवर गोळीबार झाल्याचा दावा केला आहे.
ओवेसी यांनी ट्विट करत म्हटले आहे, की 'काही वेळापूर्वी छिजारसी टोल गेटवर माझ्या कारवर गोळीबार झाला. 4 राऊंड फायर झाले. 3-4 लोक होते, सर्वच्या सर्व शस्त्रे तेथेच सोडून पळून गेले. माझी गाडी पंक्चर झाली, पण मी दुसऱ्या गाडीत बसून तेथून निघून गेलो. आम्ही सर्व जण सुरक्षित आहोत. अलहमदू लिलाह.'
यासंदर्भात बोलताना मिरतचे आयजी म्हणाले, पिलखुवा प्लाझा येथे गोळीबार झाल्याचे बोलले जात आहे. आम्ही सीसीटीव्ही बघत आहोत. या मार्गावरून ओवेसींचा ताफा जात होता. काही लोकांत वाद झाला होता. एवढी माहिती मिळाली होती. या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही. तसेच, सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतरच गोळीबार झाला की नाही यासंदर्भात पुष्टी होऊ शकेल. तसेच, कुठल्याही प्रकारचा गोळीबार झाला नाही, असे टोल कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.