मैनपुरी : केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते एसपी सिंह बघेल (SP Singh Baghel), यांनी करहल मतदारसंघातून अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. एवढेच नाही, तर आपण सपाच्या बालेकिल्ल्यात त्यांच्या अध्यक्षांविरुद्ध निवडणूक जिंकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. केंद्रीय कायदा राज्यमंत्री बघेल अर्ज दाखल केल्यानंतर म्हणाले, अमेठी आणि कन्नौजचे किल्लेही ढासळताना बघितले आहेत आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधीही निवडणुकीत पराभूत झाल्या आहेत. अचानकपणे, कोणतीही घोषणा न करता, करहल येथून उमेदवारी अर्ज भरण्यासंदर्भात त्यांना विचारले असता, बघेल हसले आणि म्हणाले, ते मिलट्री सायंसचे प्राध्यापक आहेत आणि युद्धात सरप्राइजचे अत्यंत महत्व असते.
यापूर्वीही आपण यादव कुटुंबाविरुद्ध लढला आहात. आपला अनुभव पाहून भाजपने आपल्याला अखिलेश यादव यांच्याविरोधात मैदानात उतरवले आहे का? यावर बघेल म्हणाले, हायकमनला विचारा की, त्यांनी मला या जागेवर का उतरवले आहे. पण समाजवादी पक्षाने आपला क्रमांक एकचा उमेदवार येथून उतरवला असेल, तर भाजपने काहीतरी विचार केलाच असेल. ही निवडणूक मी कार्यकरत्यांच्या आणि संघटनेच्या बळावर आणि पंतप्रधान मोदींच्या आशीर्वादाने लढणार आहे.
तत्पूर्वी, समाजवादी पक्षाचे (एसपी) राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आजच (सोमवारी) मैनपुरीच्या करहल विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अखिलेश यांना शह देण्यासाठी भाजपनेही मोठा डाव लावला आहे. भादपने अखिलेश यांच्या समोर केंद्रीय कायदा राज्यमंत्री एसपी सिंह बघेल यांना उभे केले आहे. एसपी सिंह बघेल हे आग्र्याचे खासदारही आहेत.
करहलमध्ये भाजप जिंकेल!करहलमधून केंद्रीय मंत्री एसपी सिंह बघेल यांना उमेदवारी दिल्यानंतर यूपीचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी ट्विट केले आहे की, 'करहलमधून भाजप जिंकेल, प्रो एसपी सिंह बघेल जिंकतील, 2022 मध्ये यादव अखिलेश करहलमधून पराभूत होतील, भाजप जिंकेल, कमळ फुलेल, सुशासन राहील, विकास सुरूच राहील.'
अखिलेश यांचे जंगी स्वागत -सैफई ते करहल यात सुमारे 30 किमी एवढे अंतर आहे. यावेळी अखिलेश यांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. रथावर असलेल्या सपा अध्यक्षांनी हस्तांदोलन करत जनतेला अभिवादन केले. अखिलेश यादव एक वाजण्याच्या सुमारास मैनपुरी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी अर्ज दाखल केला.
यावेळी करहलमध्ये अखिलेश यांच्या सोबत त्यांच्या निवडणूक व्यवस्थापनाची धुरा हाती घेतलेले माजी खासदार तेज प्रताप यादव उर्फ तेजू आणि करहलचे आमदार सोबरन सिंह यादवही उपस्थित होत. याशिवाय पक्षाचे प्रमुख राष्ट्रीय सरचिटणीस आणि राज्य सभा खासदार प्रोफेसर रामगोपाल यादवही उपस्थित होते.
सपा अध्यक्ष अखिलेश यादव हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढत आहेत. यामुळे मैनपुरीतील राजकीय वातावरण तापले आहे. करहल येथे तिसऱ्या टप्प्यात 20 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. काँग्रेसने या जागेवर ज्ञानवती यादव यांना, तर बीएसपीने कुलदीप नारायण यांना उमेदवारी दिली आहे.