लखनौ - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने आपल्या निवडणूक प्रचाराला धार देण्यासाठी एक नवे गाणे लाँच केले आहे. सपाच्या "अखिलये आये" या निवडणूक गीतानंतर, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी आज भारतीय जनता पक्षाचे निवडणूक गीत रिलीज केले. भाजपच्या उत्तर प्रदेश ट्विटर हँडलवरून ट्विट करून पक्षाने ही माहिती दिली. तत्पूर्वी भाजपने उत्तर प्रदेशमधील निवडणुकांसाठी उमेदवारांच्या २ याद्या जाहीर केल्या होत्या. आता, ८५ उमेदवारांची तिसरी यादीही जाहीर करण्यात आली आहे.
भाजपने तिसऱ्या यादीत नुकतेच पोलीस सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतलेले असीम अरुण यांना कन्नौज येथून उमेदवारी दिली आहे. तर, आदितीसिंह यांना रायबरेली मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं आहे. तसेच, नुकतेच समाजवादी पक्षातून भाजपात आलेले विधानसभा उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेले नितीन अग्रवाल यांना भाजपने हरदोई सदर येथून उमेदवारी घोषित केली आहे. भाजपने घोषित केलेल्या ८५ उमेवारांच्या तिसऱ्या यादीत १५ महिलांना संधी देण्यात आली आहे.
भाजपने शनिवारी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीवर ओबीसी नेत्यांचा प्रभाव दिसून आला. भाजपच्या दुसऱ्या यादीतील १०७ उमेदवारांमध्ये तब्बल ४४ उमेदवार ओबीसी आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूर शहर या मतदार संघातूनच निवडणूक लढतील, हे आज स्पष्ट झाले आहे. या यादीत १९ अनुसूचित जातीचे तर १० महिलांना भाजपने उमेदवारी दिली आहे. एकाही मुस्लिम उमेदवाराला भाजपने उमेदवारी दिलेली नाही. दरम्यान, आज भाजपने ८५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे.
भाजपचे प्रचार गीत
भाजपच्या युपीतील थीम साँगच्या सुरुवातीच्या सीनमध्येच अयोध्येचे भव्य राम मंदिर दाखवण्यात आले असून, मेट्रो ट्रेनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ एकत्र दिसत आहेत. संपूर्ण गाण्यादरम्यान मोठ्या आवाजात ढोलही वाजत आहे.