उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत मौन बाळगणाऱ्या मायावती 15 जानेवारीला म्हणजेच त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी समोर आल्या आणि त्यांनी स्वामींवर जोरदार हल्ला चढवला. एवढेच नाही तर जातींच्या नावावर होत असलेल्या राजकारणात त्यांची रणनीती काय असेल, हेही त्यांनी संपष्ट केले. स्वामी प्रसाद मौर्य यांचा उल्लेख करत मायावती म्हणाल्या, ते कशा प्रकारे विष ओकत आहेत, हे आपण सर्वांनीच पाहिले असेल.
यावेळी बसपा प्रमुख मायावती यांनी आंबेडकरवादाची व्याख्याही सांगितली. त्या म्हणाल्या, 'जेव्हा आपण आंबेडकरवादाची चर्चा करतो, तेव्हा आपल्याला समजायला हवे, की ते कुठल्याही जाती विरोधात नव्हते, तर ते जातीव्यवस्थेच्या विरोधात होते. ते ही वाईट व्यवस्था समूळ नष्ट करून समतावादी समाजाची निर्मिती करण्यासंदर्भात बोलत होते. यामुळे विरोधात असलेल्या उच्चवर्णीयांना सोबत घेऊन चालावे लागेल. समाजात जेव्हा एकोपा निर्माण होईल, तेव्हाच समतावादी समाजाची निर्मिती होईल.'
मायावतींच्या 'BDM' समीकरणानं सपाचं गणित बिघडणार?सपाच्या 85 विरुद्ध 15 च्या लढाईला शह देण्यासाठी मायावती या सर्वजन हिताय-सर्वजन सुखायची घोषणा घेऊन मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे. मायावतींनी उच्च बंधुत्वाचा संदेश देत, थेट उच्चवर्णीयांना साधण्याचेच संकेत दिले आहेत. याच वेळी त्यांनी त्यांची पहिली यादीही जाहीर केली आहे. यात मुस्लीम आणि ब्राह्मणांना सर्वाधिक तिकिटे देण्यात आली आहेत. ब्राह्मण, दलित आणि मुस्लिमांच्या 'BDM' समिकरणावर त्या पुढे जात असल्याचे दिसत आहे. त्यांचे हे समीकरण यशस्वी झाल्यास सपाला मोठा झटका बसू शकतो. कारण सपाचा 85 टक्के एवढा मोठा भागच मायावतींच्या 'बीडीएम' समीकरणात सामील आहे.
17 टक्के ब्राह्मणांना दिले तिकीट -बहुजन समाज पक्षाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत मुस्लीम आणि ब्राह्मणांना पूर्ण स्थान देण्यात आले आहे. पक्षाने जाहीर केलेल्या यादीत सुमारे 17 टक्के ब्राह्मणांना तिकीट देण्यात आले आहे. यापूर्वी 2007 मध्ये बसपा सत्तेत आल्यावर पक्षाने सुमारे 25 टक्के ब्राह्मण उमेदवारांना तिकीट दिले होते. याच फॉर्म्यूल्यावर ही निवडणूकही लढविण्याचे मायावतींनी ठरवले आहे. यावेळी ब्राह्मण मतदारांची भाजपवर नाराजी असल्याचेही वृत्त आहे. अशा स्थितीत बसपा प्रमुख मायावती नाराज मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यांनी पहिल्या यादीत 9 ब्राह्मण उमेदवारांना तिकीट दिले आहे.