बुलंदशहर - उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचे (UP Assembly Elections) वातावरण चांगलेच तापले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी बुधवारी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्यावर थेट हल्ला चढवला. यावेळी त्यांनी सपा-आरएलडी आघाडीचे नाव न घेता त्यांचा उल्लेख सडलेला माल असा केला. एवढेच नाही, तर सरकारमध्ये येण्याचे त्यांचे स्वप्न 'कयामत'च्या दिवसापर्यंतही पूर्ण होणार नाही. 10 मार्चनंतर पूर्ण गर्मी शांत करू, असेही योगी म्हणाले. ते बुलंदशहर येथे निवडणूक प्रचार रॅलीला संबोधित करत होते.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुझफ्फरनगर दंगलीचा उल्लेख करत म्हणाले, 2013 मध्ये मुझफ्फरनगर दंगल झाली. तेव्हा सचिन आणि गौरव नावाच्या दोन जाट तरुणांची निर्घृण हत्या करण्यात आली. तेव्हा लखनौचा पोरगा सत्तेत होता, हत्या करवत होता, मारेकऱ्यांना आश्रय देत होता आणि दंगलखोरांना लखनौला बोलावून त्यांना सन्मानित करत होता. दंगलखोरांविरुद्ध आवाज उठवणाऱ्या भाजप कार्यकर्त्यावर खोटे गुन्हे दाखल करून तुरुंगात डांबले जात होते. दिल्लीचा पोरगा तेव्हाही तमाशा करत म्हणायचा की, दंगेखोरांवर कठोर कारवाई व्हायला नको. ते तेव्हाही त्यांचा बचावच करत होते.
बुलंदशहर येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना, सीएम योगींनी सपा-आरएलडी आघाडीवर निशाणा साधला. ते म्हणाले, हे लोक (एसपी-आरएलडी) पुन्हा नव्या कव्हरमध्ये आले आहेत. माल तोच आहे, कव्हर नवीन आहे. माल तोच सडलेला आहे, ज्यांनी असुरक्षितता, दंगली आणि माफिया दिले. ते आजही म्हणत आहेत, येऊ द्या सरकार. आम्ही म्हणालो, असे होणार नाही. 'कयामत'च्या दिवसापर्यंत तुमचे स्वप्न पूर्ण होणार नाही. हे समजून घ्या. पण लक्षात असू द्या, 10 मार्चनंतर ही संपूर्ण गर्मी शांत करू.