लखनौ - उत्तर प्रदेशात निवडणुकांच्या तोंडावर आता नेत्यांची बंडखोरी आणि पक्षांतराची घाई दिसून येत आहे. तिकीट वाटपानंतर अनेकजण या पक्षातून त्या पक्षात उड्या घेत आहेत. मंगळवारीच मथुरातील भाजपा नेते एस.के शर्मा यांनी भाजपला रामराम केला असून लवकरच नवीन घोषणा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तर, दुसरीकडे काँग्रेसला बाय करत काहीजण भाजपातही येत आहेत. काँग्रेसच्या महिला काँग्रेस मध्ये झोनच्या उपाध्यक्ष डॉ. प्रियंका मौर्य भाजपात प्रवेश करणार आहेत.
लखनौ येथील भाजप कार्यालयात जाऊन त्या भाजप प्रवेश करणार आहेत. काँग्रेसच्या तिकीट वाटपावर त्यांनी नाराजी व्यक्त करत गंभीर आरोपही केले आहेत. विशेष म्हणजे प्रियंका मौर्य ह्या काँग्रेसच्या लडकी हूँ, लड सकती हूँ... या कॅम्पेनच्या पोस्टर गर्ल आहेत. म्हणजे या कॅम्पेनच्या जाहिरातीवर त्यांचा फोटो झळकला आहे. त्यामुळे, त्या प्रियंका गांधी यांच्या निकटवर्तीय मानल्या जात. मात्र, आता त्यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं आहे.
प्रियंका गांधी वाड्रा यांचे सचिव संदीप सिंह यांनी काँग्रेसच्या विधानसभा उमेदवारीचं तिकीट देण्यासाठी लाच मागितल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय. काँग्रेसच्या माझ्या नावाचा, चेहऱ्याचा आणि 10 लाख फॉलोअर्सचा वापर करुन घेतला. मात्र, तिकीट देतेवेळी मला सचिव संदीप सिंह यांच्याकडून पैशांची मागणी करण्यात आली. मी पैसे न दिल्यानेच माझे तिकीट कापण्यात आल्याचे प्रियंका मौर्य यांनी म्हटले आहे. विशेष म्हजे या सगळ्यांचे पुरावेही आपल्याकडे आहेत, वेळ आल्यात ते सादर करेने, असेही त्या म्हणाल्या.