लखनौ - निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना शेवटच्यादिवशी शक्तीप्रदर्शन करत आणि सर्वांचे अर्ज दाखल झाल्यानंतरच आपण भरावा, अशी अनेकांची मनस्थिती असते. त्यानुसार, उमेदवाराची शेवटच्यादिवशी अर्ज भरताना चांगलीच दमछाक होते. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांसाठीही एका उमेदवाराची अशीच दमछाक झाल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे राज्याचे क्रीडामंत्री असलेल्या उपेंद्र तिवारी यांनी धावत-पळत जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचावं लागलं. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
उपेंद्र तिवारी यांनी फेफना विधानसभा मतदारसंघातून 4 फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी, अर्ज भरण्याची वेळ आणि मुदत संपत असल्याने त्यांनी थेट धावत-पळत कार्यालय गाठले. सगळ्यात हारांच्या माळा आणि सोबत वकिल मंडळींना घेऊन ते पळत-पळत अर्ज भरण्यासाठी पोहोचले. यावेळी, माध्यम प्रतिनीधींनी त्यांचा व्हिडिओ शूट केला. सध्या तो व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामध्ये, ते जोरजोरात पळताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही.