लखनौ - देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. अद्याप जाहीर प्रचारसभांना बंदी घालण्यात आल्याने डिजिटल यंत्रणांद्वारेच प्रचार सुरू आहे. त्यातही प्रचारासाठी नवनवीन संकल्पना पुढे आणल्या जात आहेत. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतिष्ठा येथे पणाला लागली आहे. येथील निवडणुकांच्या प्रचारातही हेच दोन्ही नेते झळकत आहेत. सध्या, मोदी-योगींचे छायाचित्र असलेल्या साडीचा फोटो व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत असून यावर कमळाचे चिन्ह दिसून येते. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ आणि राम मंदिराचा फोटो छापण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमधील महिलांना या साड्या वाटल्या जाणार असल्याचे सांगण्यात येते. या साड्या गुजरातच्या सुरतमध्ये बनविण्यात आल्या असून या साड्यांवर संदेशही लिहिण्यात आला आहे. हम उनको लेकर आएंगे, जो राम को लेकर आए है ! असा मेसेज या साड्यांवर दिसून येतो.
पूर्व आणि पश्चिम उत्तर प्रदेशात 1 हजार साड्यांचा वाटप करण्यात येणार आहे. त्यावर, अयोध्येतील राम मंदिर आणि योगी आदित्यनाथ यांचेही छायाचित्र आहे. म्हणजे, यंदाच्या युपी विधानसभा निवडणुकीत राम मंदिर उभारण्याचं श्रेय घेत तोच प्रचाराचा मुद्दा बनविण्यात येत असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, 10 फेब्रुवारी रोजी युपीतील पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होत आहे.