लखनौ - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Election 2022) पहिल्या टप्प्यातील 58 जागांसाठी आज मतदान होत आहे. तर दुसऱ्या टप्प्यासाठी निवडणूक प्रचार सुरू आहे. निवडणूक प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यासाठी, दिग्गज नेते विविध प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रचार करत आहेत. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे आज रामपूरमध्ये आगमन झाले. तत्पूर्वी आज एक पंक्चर बनविणाऱ्या दुकानात संवाद साधताना दिसून आल्या.
रामपूरमध्ये येताच रामपूर शहर विधानसभेचे उमेदवार नावेद मियाँ आणि बेगम बानो यांनी त्यांचे स्वागत केले. या दौऱ्यात शाहबाद मतदारसंघाचे उमेदवार एकलव्य यांचीही भेट घ्यायची होती. एकलव्य यांच्या विधानसभा मतदारसंघात प्रियंका गांधींच्या रोड शोचा कार्यक्रम झाला नाही. त्यामुळे एकलव्य यांना रामपूर शहरात येऊन त्यांच्या ताफ्यासह जायचे होते. तत्पूर्वी प्रियंका गांधी यांनी डोर टू डोर प्रचार करण्यास सुरुवात केली. यावेळी, एका पंक्चर दुकानात जाऊन त्यांनी दुकानदाराशी संवाद साधला. विशेष म्हणजे यावेळी प्रियंका गांधींनी काँग्रेसचा जाहीरनामाही वाचून दाखवला. या भेटीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
युपी काँग्रेसने ट्विटर अकाऊंटवरुन याबाबतचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यासह, खऱ्या मुद्द्यांवर मत द्या, काँग्रेसला मत द्या असे कॅप्शनही देण्यात आले आहे.
'कुठे गेले, हद्द झाली!'
रामपूरच्या निवडणूक रॅलीत प्रियांका गांधी आपल्या पक्षासाठी मतं मागण्यासाठी मंचावर पोहोचल्या. त्यावेळी त्यांना आपला उमेदवार दिसला नाही, तेव्हा त्या चिंतेत दिसून आल्या. त्यांना आधी वाटलं इथेच कुठेतरी असतील, पण बराच वेळ काँग्रेस उमेदवार एकलव्य पोहोचले नाहीत. तेव्हा प्रियंका गांधी म्हणाल्या, कुठे गेले…अरे कुठे गेले, हद्द झाली!