उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत आता रंगत येऊ लागली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या सभेमध्ये शेतकऱ्यांनी शेकडो बैल सोडले यामुळे मोठी खळबळ उडाली होती. अशातच सपा उमेदवाराचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये त्याला त्याच्याच घरावर भाजपाचा झेंडा फडकताना पाहून रडू कोसळले आणि तो कधी खाली कोसळला ते देखील समजले नाही.
बुधवारी म्हणजेच उद्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. बलियाच्या सदर विधानसभा मतदारसंघातून सपाचे नारद राय (SP Candidate Narad Rai) उभे राहिले आहेत. ते मतदारसंघात सध्या प्रचारात व्यस्त आहेत. सोमवारी ते त्यांच्या वडिलोपार्जित घरासमोर प्रचारासाठी आले होते. परंतू घराकडे पाहताच त्यांना मोठा धक्का बसला. त्यांच्या घरावर भाजपाचा झेंडा फडकत होता.
लोकांना मतदान करण्याचे आवाहन करत असताना ते तो झेंडा पाहून रडू लागले. ''तुम्हाला आमचे घर पेटवायचे आहे. देव न करो आमचे शहर बदलेल, आमच्या घराला आग लावतील ते सुरक्षितही राहणार नाहीत. हे आमचे घर आहे, ज्यांनी आमच्या घरावर भाजपाचा झेंडा लावून माझे हृदय तोडले, ते सुरक्षित राहणार नाहीत''', असे रडत रडत म्हणत ते रॅलीच्या टेम्पोमध्येच कोसळले.