लखनौ - भारत-श्रीलंका यांच्यातील सामन्यासाठी लखनौमध्ये आल्यानंतर राजीव शुक्ला यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी, देशातील राजकीय परिस्थिती आणि काँग्रेसबद्दल मत व्यक्त केलं. भाजप आणि समाजवादी पक्षाकडून विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, या दोन्ही पक्षांचा अंदाज चुकीचा ठरेल, असे आयपीएलचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते राजीव शुक्ला यांनी म्हटल आहे.
सध्या देशात पाच राज्यांच्या निवडणुका सुरू आहेत. यात सर्वांच्या नजरा उत्तर प्रदेशावर लागल्या आहेत. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी दावा केला आहे की, भाजप पाचपैकी चार राज्यांमध्ये पुन्हा एकदा सरकार स्थापन करेल. त्यांच्या मते, सध्या ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे तेथे सत्ताविरोधी घटकच नाही, असे नड्डा यांनी म्हटले आहे. मात्र, काँग्रेस नेते राजीव शुक्ला यांनी युपीतील निकाल हा आश्चर्यचकीत करणारा आहे, असेही ते म्हणाले.
राजीव शुक्ला यांनी उत्तर प्रदेशातील निवडणुकींवर भाष्य केल आहे. उत्तर प्रदेशात आश्चर्यकारक निकाल पाहायला मिळेल, असे शुक्ला यांनी म्हटले. काँग्रेसला किती जागा मिळतील हे सांगायला मी ज्योतिषी नाही, पण उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांचा निकाल वेगळाच पाहायला मिळेल. प. बंगालप्रमाणेच युपीतील निकालही डोळ्याच्या भुवया उंचावणार ठरेल, असे राजीव शुक्ला यांनी म्हटले.
काय म्हणाले नड्डा
चार राज्यांमध्ये लाट आमच्या बाजूने आहे. उत्तर प्रदेशात तर भाजप 300 हून अधिक जागा जिंकेल. गोवा आणि उत्तराखंडमध्ये मतदान पार पडले असून, यूपीमध्ये चार फेऱ्यांचे मतदान झाले आहे. तर मणिपूरमध्ये दोन्ही टप्प्यात निवडणूक होणे बाकी आहे. निवडणुकीचा निकाल 10 मार्चला लागणार आहे.