UP Election 2022 : सध्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकांचे (Uttar pradesh assembly election 2022) वारे वाहू लागले आहेत. येत्या काही दिवसांमध्येच मतदान प्रक्रिया पार पडेल. भाजपनं या निवडणुकीत आपली ताकद लावण्यासही सुरूवात केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर गेले आहेत. तर गुरूवारी त्यांनी अनुपशहर येथे नागरिकांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधसा. "जे आपल्या वडिलांचं, काकांचं ऐकत नाहीत ते तुमचं काय ऐकणार?," असं म्हणत त्यांनी अखिलेश यादवांना टोला लगावला.
"दोन तृतीयांश बहुमतानं योगी आदित्यनाथ पुन्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनतील. आज कोणत्याही भूमाफियांची कोणाला त्रास देण्याची हिंमत आहे का? हे तुम्हीच सांगा. माफियांना पळ ठोकला आहे. मी पुन्हा सांगतो माफिया केवळ तीन ठिकाणी आहे, उत्तर प्रदेशच्या बाहेर, तुरुंगात अथवा सपाच्या यादीत," असं शाह म्हणाले.
"मतदानाच्या दिवशी कमळाचं बटण अशाप्रकारे दाबा की झटका थेट तुरुंगात बंद असलेल्या आझम खान यांना लागेल," असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी जयंत चौधरी आणि अखिलेश यांदव यांच्यावरही टीकेचा बाण सोडला. "अखिलेश यादव उत्तर प्रदेशातील कायदा व्यवस्था ठीक ठेवू शकतात का हे तुम्हीच सांगा. आजकाल ते पत्रकार परिषद घेतात, सोबत जयंत चौधरींना बसवतात. परंतु त्यांच सरकार बनणार नाही. जे आपल्या वडिलांचं, काकांचं ऐकत नाहीत, ते तुमचं काय ऐकतील?," असंही शाह म्हणाले.
आणखी एक संधी द्यापाच वर्षांत योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशला बदलण्याचं काम केलं आहे. त्यांना तुम्ही आणखी एक संधी द्या. पुढील पाच वर्षांमध्ये उत्तर प्रदेश देशातील पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.