लखनऊ: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर समाजवादी पक्षानं सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला धक्के दिले. योगी सरकारमधील तीन मंत्र्यांनी सपामध्ये प्रवेश केला. आतापर्यंत डझनभर आमदारांनी भाजपला रामराम करत सपाची वाट धरली. यानंतर आता भाजपनं प्रतिहल्ला सुरू केला आहे. अखिलेश यांचे वडिल, समाजवादी पक्षाचे माजी अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांची सून अपर्णा यादव यांना भाजपमध्ये सामील करून सत्ताधारी पक्षानं अखिलेश यांना जोरदार धक्का दिला. यानंतर आता दुसरा मोठा धक्का देण्याची तयारी भाजपनं सुरू केली आहे.
अखिलेश यादव यांचे काका शिवपाल यादव भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा उत्तर प्रदेश भाजपच्या जॉईनिंग कमिटीचे चेअरमन डॉ. लक्ष्मीकांत वाजपेयींनी केला. अखिलेश यादव यांना स्वत:चं कुटुंबदेखील सांभाळत येत नाही. अपर्णा यादव भाजपमध्ये आल्या आहेत. याचा फायदा अपर्णा यादव आणि भाजप दोघांना होईल, असा दावा त्यांनी केला.
शिवपाल यादव भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात येत असल्यानं उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ माजली आहे. अपर्णा यादव सातत्यानं योगी आणि पंतप्रधान मोदींच्या कामाचं कौतुक करायच्या. त्यामुळे त्या भाजपमध्ये जातील अशी चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. लखनऊमधल्या कैंट विधानसभा मतदारसंघातून अपर्णा यांना निवडणूक लढवायची होती. मात्र अखिलेश यांनी नकार दर्शवला होता.
अखिलेश यादव यांच्यासोबत मतभेद असल्यानं शिवपाल यांनी प्रगतीशील समाजवादी पक्ष स्थापन केला. पक्षावर वर्चस्व गाजवण्याच्या हेतूनं अखिलेश आणि शिवपाल आमनेसामने आले होते. यानंतर शिवपाल यांनी स्वत:चा पक्ष स्थापन केला. मात्र नंतर दोघांमधले मतभेद काही प्रमाणात कमी झाले आणि त्यांनी हातमिळवणी केली. शिवपाल यांनी अखिलेश यांच्या पक्षाशी युती करण्याचा निर्णय घेतला.