नवी दिल्ली: आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस महासचिव आणि उत्तर प्रदेश युनिटच्या प्रभारी प्रियंका गांधी-वाड्रा यांनी एक मोठी घोषणा केली आहे. राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यावर मुलींना स्मार्टफोन आणि इलेक्ट्रिक स्कूटी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
गुरुवारी एका ट्विटमध्ये त्या म्हणाल्या, 'मी काही मुलींना भेटले, त्यांनी सांगितले की त्यांना अभ्यासासाठी स्मार्टफोनची गरज आहे. मी आज घोषणा करतीये की, उत्तर प्रदेशात काँग्रसची सत्ता आल्यावर पदवी उत्तीर्ण झालेल्या मुलींना इलेक्ट्रिक स्कूटी आणि बारावी झालेल्या मुलींना स्मार्टफोन देण्यात येईल.' महिलांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने मोठी घोषणा केली आहे. यापूर्वी काँग्रेसने उत्तर प्रदेशातील महिलांना 40 टक्के तिकिटे देण्याची घोषणा केली होती.
महिलांना 40 टक्के जागा राखीवप्रियंका यांनी मंगळवारी घोषणा केली होती की, त्यांचा पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत महिलांना 40 टक्के तिकीट देईल. ज्या महिलांना व्यवस्थेत बदल घडवायचा आहे, त्यांनी पुढे येऊन निवडणूक लढवावी. ज्या महिलेला निवडणूक लढवायची आहे, त्यांनी 15 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करू शकता, अशी घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेत केली होती.