लखनऊ: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची रंगत वाढत चालली आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षानं निवडणूक जिंकण्यासाठी संपूर्ण जोर लावला आहे. निवडणुकीच्या तोंडावर यादव कुटुंब फोडत भाजपनं समाजवादी पक्षाला धक्का दिला. आता सपानं भाजपला धक्का देण्याची तयारी केली आहे. भाजपच्या स्वाती सिंह सपामध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे.
लखनऊच्या सरोजिनी नगर विधानसभा मतदारसंघातून स्वाती सिंह इच्छुक होत्या. भाजपकडून त्यांना उमेदवारी हवी होती. पण त्यांच्याऐवजी त्यांचे पती ईडीचे माजी सहसंचालक राजेश्वर सिंह यांना भाजपनं उमेदवारी दिली. पक्षाच्या या निर्णयावर स्वाती नाराज आहेत. मात्र स्वाती सिंह यांनी यावर अद्याप तरी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
स्वाती सिंह यांच्यासाठी समाजवादी पक्षानं दरवाजे उघडे ठेवले आहेत. लखनऊमध्ये असलेल्या सर्व मतदारसंघाचे उमेदवार सपानं जाहीर केले आहेत. मात्र सरोजिनी नगरसाठी त्यांनी अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. स्वाती सिंह यांचं तिकीट कापलं जाणार असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. त्यामुळेच सपानं सरोजिनी नगरसाठी उमेदवारी जाहीर केली नाही.
काही दिवसांपूर्वी अपर्णा यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सपाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांच्या सूनबाई असलेल्या अपर्णा यांच्या हाती कमळ देत भाजपनं सपाला धक्का दिला. आता त्याचाच बदला घेण्याची संधी सपाला शोधत आहे. स्वाती सिंह यांना प्रवेश देण्याची तयारी सपानं केली आहे. अपर्णा यादव यांना भाजपमध्ये घेऊन सत्ताधारी पक्षानं कुटुंब फोडलं. आता स्वाती यांना तिकीट देऊन त्यांच्याच पतीविरोधात उमेदवारी देण्याच्या हालचाली सपानं सुरू केल्या आहेत.