लखनऊ : उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचे (UP Assembly Elections) वातावरण चांगलेच तापले आहे. समाजवादी पार्टीचे (Samajwadi Party) प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) आणि राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष जयंत चौधरी (Jayant Chaudhary) यांनी बुलंदशहरमध्ये आघाडीचा प्रचार केला. संयुक्त पत्रकार परिषदेत अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या 10 मार्चनंतर पूर्ण गर्मी शांत करू, या विधानावरून त्यांच्यावर निशाणा साधला.
'योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री आहेत, कॉम्प्रेसर थोडेच आहेत, जे थंड करतील', असे म्हणत अखिलेश यादव यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच, अखिलेश यादव म्हणाले की, प्रत्यक्षात भाजपाचा पराभव पाहून धक्का बसला आहे. याचबरोबर, बुलंदशहर घटना आणि हाथरसची घटना सरकारचे अपयश दर्शवते. तेथे कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या पद्धतीने त्यांच्या मुलीचे अंतिम संस्कार करण्याची संधी दिली गेली नाही. बुलंदशहर घटनेतील आरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत. याचे उत्तर सरकारने द्यावे, असे अखिलेश यादव म्हणाले.
अखिलेश यादव यांनी बुलंदशहरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, राज्यात समाजवादी पार्टीचे सरकार आल्यास उत्तर प्रदेशात नोकरभरती सुरू केली जाईल. केंद्रीय अर्थसंकल्पातही आपली फसवणूक झाल्याचे आज देशातील शेतकरी दु:खी आहेत. कोणता अर्थसंकल्प आला आहे, हे गरिबांना कळतही नाही. सरकार याला अमृत अर्थसंकल्प म्हणत आहे. अमृत अर्थसंकल्प असेल तर त्याआधी सगळे विषारी अर्थसंकल्प होते का? असा सवाल करत अखिलेश यादव यांनी भाजपावर टीका केली आहे.
10 मार्चनंतर पूर्ण गर्मी शांत करू - योगी आदित्यनाथदरम्यान, बुधवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर थेट हल्ला चढवला होता. यावेळी त्यांनी सपा-आरएलडी आघाडीचे नाव न घेता त्यांचा उल्लेख सडलेला माल असा केला. एवढेच नाही, तर सरकारमध्ये येण्याचे त्यांचे स्वप्न 'कयामत'च्या दिवसापर्यंतही पूर्ण होणार नाही. 10 मार्चनंतर पूर्ण गर्मी शांत करू, असेही योगी आदित्यनाथ म्हणाले होते. ते बुलंदशहर येथे निवडणूक प्रचार रॅलीला संबोधित करत होते.
योगी आदित्यनाथ म्हणाले, हे लोक (एसपी-आरएलडी) पुन्हा नव्या कव्हरमध्ये आले आहेत. माल तोच आहे, कव्हर नवीन आहे. माल तोच सडलेला आहे, ज्यांनी असुरक्षितता, दंगली आणि माफिया दिले. ते आजही म्हणत आहेत, येऊ द्या सरकार. आम्ही म्हणालो, असे होणार नाही. 'कयामत'च्या दिवसापर्यंत तुमचे स्वप्न पूर्ण होणार नाही. हे समजून घ्या. पण लक्षात असू द्या, 10 मार्चनंतर ही संपूर्ण गर्मी शांत करू.