कानपूर:उत्तर प्रदेशात लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. भाजपकडून विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहेत. दरम्यान, भाजपच्या एका माजी खासदाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात तो, ए.के. शर्मा आगामी काळात यूपीचे मुख्यमंत्री होऊ शकतात, असे म्हणताना दिसत आहेत.
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष ए.के. शर्मा आगामी काळात यूपीचे मुख्यमंत्री होऊ शकतात, असे घोसीचे माजी खासदार हरिनारायण राजभर सांगत आहेत. हा व्हिडीओ 4 जानेवारीला मऊमध्ये झालेल्या सभेचा आहे. हरिनारायण राजभर यांनी जाहीर सभेत एके शर्मा यांना मुख्यमंत्री करण्यासाठी काम करणार असल्याची शपथ घेतली.
घोसीचे माजी खासदार राजभर म्हणतात की, 'आम्ही तिवारीजींना सांगितले होते की, भविष्यात शर्मा जी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात. शर्माजींना मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही आमचे आयुष्य खर्ची घालू. मी आज शपथ घेतो की एके शर्मा यांना यूपीचा मुख्यमंत्री बनवण्यासाठी काम करेन, त्यांच्या राज्यासाठी आणि मऊच्या लोकांसाठी काम करेन.' दरम्यान, भाजपच्या माजी खासदाराच्या व्हिडिओवरुन विरोधक भाजपवर हल्लाबोल करत आहेत. योगी आदित्यनाथ हे भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार नाहीत का ? असा सवाल विरोधक करत आहेत.
सपाचे प्रवक्ते अनुराग भदौरिया यांनी सीएम योगींवर ताशेरे ओढले. 'योगी जिथे जात आहेत तिथे म्हणतात की ते इथून निवडणूक लढवणार आहे. मथूरेत तेच आणि अयोध्येतही तेच म्हणतात. मी भाजपला सांगू इच्छितो की, आधी तिकीट फायनल करा. भाजपचे सरकारच येणार नाही मग मुख्यमंत्री काय होणार', असा टोला त्यांनी लगावला. तर, आपचे नेते संजय सिंघ यांनीही व्हिडिओ शेअर करत योगींवर टीका केली. 'योगी जी अनुपयोगी आणि शर्मा जी उपयोगी, हे कधी झालं?' असा खोचक सवाल त्यांनी केला.
कोण आहेत एके शर्मा ?एके शर्मा हे माजी IAS अधिकारी आहेत. सध्या ते यूपी भाजपचे उपाध्यक्ष आणि UP विधान परिषदेचे सदस्य आहेत. जानेवारी 2021 मध्ये त्यांनी IAS पदाचा राजीनामा दिला आणि राजकारणात प्रवेश केला. एके शर्मा हे पीएम मोदींचे जवळचे मानले जातात. त्यांनी पीएम मोदींसोबत 20 वर्षे काम केले आहे. यासोबतच ते पीएमओमध्ये 5 वर्षे राहिले. मढचे रहिवासी ए के शर्मा हे राजकारणात असल्याने त्यांना राज्यात मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. आता हरिनारायण राजभर यांच्या व्हायरल व्हिडिओनंतर विरोधकांना सीएम योगींवर निशाणा साधण्याची संधी मिळाली आहे.