कानपूर: उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. पक्षाचे नेते दररोज विविध ठिकाणी सभा घेत आहेत. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी आग्राच्या बह विधानसभेत पोहोचले होते. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि माजी केंद्रीय मंत्री रामजीलाल सुमन यांनी जिल्हाध्यक्ष जितेंद्र वर्मा यांना स्टेजवर हात उगारल्याची घटना घडली. यादरम्यान अखिलेश यादव जोराने हसले आणि प्रकरण शांत केले.
सविस्तर माहिती अशी की, अखिलेश यादव आग्राच्या बहमध्ये प्रचारासाठी आले होते. येथे रामजी सुमन मंचावरुन जनतेला संबोधित करत होते. यावेळी अखिलेश यादव आणि जिल्हाध्यक्ष जितेंद्र वर्मा आपसात बोलत होते. रामजीलाल यांना ही गोष्ट आवडली नाही आणि त्यांनी मंचावरच जिल्हाध्यक्षांवर हात उगारला. हे पाहून अखिलेश यादव जोराने हसले. यानंतर रामजीलाल यांनी आपले भाषण चालू ठेवले.
अखिलेशचा भाजप सरकारवर निशाणा
यावेळी सभेला संबोधित करताना अखिलेश यादव यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला. तसेच, शेतकऱ्यांसह तरुणांना आकर्षित करण्यासाठी अनेक आश्वासने दिली. अखिलेश यादव म्हणाले की, ते सत्तेत आल्यास यूपीमध्ये बटाटा प्रक्रिया युनिट उभारू. अखिलेश यादव एवढ्यावरच थांबले नाहीत. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गरज पडल्यास आम्ही व्होडका प्लांटही उभारू, असेही त्यांनी सांगितले.