लखनऊ: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. भारतीय जनता पक्षानं उत्तर प्रदेशची सत्ता राखण्यात यश मिळवलं आहे. विधानसभेचे ४०३ मतदारसंघ असलेल्या उत्तर प्रदेशात भाजप आणि मित्रपक्षांनी २६३ जागांवर आघाडी घेतली आहे. तर समाजवादी आणि मित्रपक्ष १३६ जागांवर पुढे आहेत. शिवसेना उमेदवारांनी या निवडणुकीत धूळधाण उडाली आहे.
शिवसेनेनं उत्तर प्रदेशात ६० जागांवर आपल्या उमेदवारांची नावं जाहीर केली होती. मात्र, अर्ज दाखल केल्यानंतर निवडणूक आयोगानं पक्षाच्या १९ जणांना उमेदवारी नाकारली. त्यामुळे केवळ ४१ जणांना प्रत्यक्ष निवडणूक लढवण्याची संधी मिळाली. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि महाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरे आपल्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी उत्तर प्रदेशात फिरताना दिसले. परंतु, निकालात मात्र मतदारांनी शिवसेनेला पूर्णपणे नाकारल्याचं दिसून येतंय.
'त्या' उमेदवाराचं काय झालं?गोरखपूरमध्ये शिवसेना उमेदवारासाठी खासदार संजय राऊत यांनी प्रचारसभा घेतली होती. शिवसेना नेते राजू श्रीवास्तव यांच्यासाठी राऊत यांनी प्रचार केला. यंदाच्या निवडणुकीनंतर उत्तर प्रदेशात शिवसेनेचा पहिला मंत्री होईल. श्रीवास्तव यांच्या हाती शिवसेनेचा धनुष्यबाण आहे, असं राऊत म्हणाले होते.
राजू श्रीवास्तव यांनी डोमरियागंज मतदारसंघातून निवडणूक लढवली. या मतदारसंघात सध्या भाजप आणि समाजवादी पक्षाच्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत आहे. श्रीवास्तव सध्या पाचव्या क्रमांकावर आहेत. त्यांना दुपारी अडीचपर्यंत १ हजार ४५४ मतं मिळाली. विशेष म्हणजे श्रीवास्तव यांना मिळालेली मतं काँग्रेस उमेदवारापेक्षा कमी आहेत. काँग्रेसच्या उमेदवार कांती यांना हजार मतंही मिळालेली नाहीत.