Uttar Pradesh Assembly Election Results 2022 : पाच राज्यांचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. पंजाब वगळता सर्वच राज्यांमध्ये (Punjab Assembly Election Results) भाजपला यश मिळालं आहे. उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा जनतेनं भाजपलाच संधी दिलीये. २७१ जागांवर विजय मिळवत भाजपनं आपली सत्ता कायम राखली आहे. दरम्यान, भाजपला मिळालेल्या विजयानंतर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या जनतेनं भाजपला सत्ता देण्याच्या निर्णयाचा आपण सन्मान करतो, असं ते म्हणाले. परंतु यावेळी त्यानी लोकांवर संतापही व्यक्त केला.
"उत्तर प्रदेशच्या जनतेनं भाजपला सत्ता देण्याचा निर्णय घेतला. मी जनतेच्या निर्णयाचा आदर करतो. मी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष, कार्यकर्ते, सदस्य आणि जनतेला धन्यवाद देतो, ज्यांनी आम्हाला मत दिलं. आम्ही खुप प्रयत्न केला. परंतु निकाल आमच्या अपेक्षेप्रमाणे आले नाहीत. आम्ही पुन्हा एकदा चांगली मेहनत करू," असं ओवैसी म्हणाले.
"सर्वच राजकीय पक्ष ईव्हीएमचा मुद्दा घेऊन आपला पराभव लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु ही ईव्हीएमची चूक नाही, लोकांच्या डोक्यात जी चिप टाकलीये त्याची आहे. आम्हाला यश मिळालं, परंतु ते ८०-२० असं आहे. आम्ही पुन्हा जोमानं कामाला लागू आणि पुढील वेळी आम्ही चांगली कामगिरी करू," असंही ते म्हणाले.
व्होट बँक म्हणून वापर"उत्तर प्रदेशातील अल्पसंख्यांकाचा केवळ व्होटबँक म्हणून वापर केला आहे. लखीमपूर खीरीमध्येही भाजपचा विजय झाला. म्हणूनच मी म्हणतो की हा ८०-२० चा विजय आहे. ही ८०-२० ची स्थिती वर्षांपर्यंत काय राहील आणि हे लोकांना समजण्याची गरज आहे. आमचा उत्साह कायम आहे," असंही ओवेसी यांनी स्पष्ट केलं.