लखनौ: आज(10 फेब्रुवारी)उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 11 जिल्ह्यांतील 58 जागांवर मतदान होत आहे. दरम्यान, इतरांना मतदान करण्याची अपील करणारे राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष जयंत चौधरी या निवडणुकीत मतदान करणार नसल्याचे वृत्त आहे. जयंत चौधरी यांच्या कार्यालयाने याबाबतचे निवेदन प्रसिद्ध केले.
जयंत चौधरी निवडणूक प्रचारात व्यस्त
राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष जयंत चौधरी सध्या निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. जयंत चौधरी समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासोबत निवडणूक दौऱ्यावर बिजनौरमध्ये आहेत. यामुळे ते स्वतः मतदान करु शकत नाहीत. दरम्यान, जनतेला मतदान करण्याचे आवाहन करणारे जयंत चौधरी हे स्वत: मतदान प्रक्रियेपासून दूर असल्याची चर्चा रंगली आहे.
चौधरी यांचे मतदान केंद्र मथुरेत
मिळालेल्या माहितीनुसार, जयंत चौधरी सध्या बिजनौरमध्ये असून त्यांचे मतदान केंद्र मथुरेत असल्याने त्यांना मतदान करता येणार नाही. दरम्यान, आज पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली असून उत्तर प्रदेशातील 58 जागांसाठी मतदान होत आहे. त्यासाठी, 623 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदानापूर्वी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करुन नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.