रशिया आणि युक्रेन युद्धात अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशात आणण्यासाठी 'ऑपरेशन गंगा'च्या अंतर्गत शक्य ते सारे प्रयत्न केले जात असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. हजारो नागरिकांना आतापर्यंत सुखरूप परत आणण्यात यश आलं असून आज युक्रेनमधील भारतीय नागरिकांना आपण परत आणू शकत आहोत हेच देशाच्या वाढत्या सामर्थ्याचं द्योतक आहे, असंही मोदी म्हणाले. ते उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित रॉबर्ट्सगंज येथील जाहीर सभेत बोलत होते.
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेच्या मोहितमेला अधिक गती येण्यासाठी भारतानं आपले चार मंत्री तेथे पाठवले आहेत. भारतीयांच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही कसर सोडणार नाही, असं मोदी म्हणाले. "जे लोक आत्मनिर्भर भारत मोहिमेची खिल्ली उडवतात, जे लोक भारतीय सैन्याचा अपमान करतात, जे लोक भारतीयांच्या मेहनतीनं सुरू असलेल्या मेक इन इंडिया अभियानाचीही खिल्ली उडवतात असे घराणेशाही गाजवणारे लोक भारताला कधीच ताकदवान बनवू शकत नाहीत. या घराणेशाही गाजवाऱ्या लोकांना पदोपदी भारताचा अपमान करण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. हा अपमान उत्तर प्रदेशातील लोकांचा अपमान आहे", असं नरेंद्र मोदी म्हणाले.
"ज्यांनी यूपीच्या जनतेला अशा परिस्थितीत जगण्यास भाग पाडलं. स्वातंत्र्यानंतर जेव्हा जेव्हा यांना सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांनी उत्तर प्रदेशच्या जनतेला नेहमीच मागे ठेवण्याचं काम केलं. मी आज सोनभद्र येथील नागरिकांना विनंती करायला आलोय की अशा लोकांना कधीच माफ करू नका", असं आवाहन मोदींनी यावेळी केलं.