- सुरेश भुसारी नवी दिल्ली : देशाच्या राजकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या राज्यांतील प्रादेशिक पक्षांचे आव्हान किती राहणार आहे? एमआयएम, शिवसेना, आम आदमी पक्ष (आप) व राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात जनाधार वाढण्याचा प्रयत्न करणार आहे. या पक्षांचे आव्हान प्रभावी राहणार काय? एमआयएमचे अध्यक्ष खासदार असुउद्दीन ओवैसी यांनी उत्तर प्रदेशमध्ये तूर्त १०० उमेदवार उतरविणार असल्याचे स्पष्ट केले. नंतरच्या टप्प्यात आणखी उमेदवार उतरवले जातील, असेही त्यांनी सांगितले. एमआयएमचा मतदार हा मुस्लीमबहुल असल्याने याचा फटका समाजवादी पार्टीला होईल, हे स्पष्ट आहे. बिहार व पश्चिम बंगालच्या निवडणुकीत एमआयएमला फारसे अस्तित्व दाखविता आले नाही. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत एमआयएमला ०.०२ टक्के मते मिळाली, तर बिहारच्या विधानसभा निवडणुकीत केवळ १.२४ टक्के मतांवर समाधान मानावे लागले होते. शिवसेनेची हजेरी हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेने उत्तर प्रदेशमध्ये ५० ते १०० जागा लढविणार असल्याचे स्पष्ट केले. शिवसेनेचा आधार हिंदू मतदार असल्यामुळे त्याचा फटका भाजपला बसणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतरही शिवसेनेचे उमेदवार ठरलेले नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एखादी जाहीर सभा वातावरण निर्मितीसाठी व भाजपची कोंडी करण्यासाठी निश्चितच फायदेशीर ठरणार आहे. राष्ट्रवादीचा चंचूप्रवेश? राष्ट्रवादी काँग्रेसने सपासोबत आघाडी केली असून एक उमेदवार निवडणूक लढणार आहे. राकाँचा हा उत्तर प्रदेशमधील चंचूप्रवेश ठरणार काय?
Uttar Pradesh Assembly Election: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत एमआयएम, शिवसेना, एनसीपीचे आव्हान किती?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 6:26 AM