UP Assembly Elections 2022: उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. भाजपच्या वतीनं आज जन विश्वास यात्रेची (Jan Vishwas Yatra) सुरुवात करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांच्या उपस्थितीत मथुरा येथून यात्रेला सुरुवात झाली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर हल्लाबोल करतानात भाजप सरकारच्या काळात झालेल्या कामांचा पाढा वाचून दाखवला.
"मी आज १९ व्यांदा बृज भूमीवर येत आहे. सर्वात आधी मी कृष्ण जन्मभूमीचं दर्शन घेतलं. माझ्या हस्ते आज जन विश्वास यात्रेचा शुभारंभ होत आहे यासाठी मी स्वत:ला खूप नशीबवान समजतो. येथील मातीच्या कणाकणामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या लीलांचा अधिवास आहे", असं योगी आदित्यनाथ म्हणाले.
"गरीबांना मोफत अन्नधान्य मिळणं हेच खरं रामराज्य आहे. आम्ही जे वचन जनतेला दिलं ते आम्ही पूर्ण केलं आणि याचं विरोधकांना खूप दु:ख होत आहे. आम्ही काश्मीरमधून कलम ३७० हटवलं. या कलमामुळे देशात दहशतवादाला प्रोत्साहन मिळत होतं. मोदी आणि शहा यांना जशी संधी मिळाली तसं दोघांनी मिळून जाचक कलम ३७० ला केराची टोपली दाखवली", असंही योग्य आदित्यनाथ म्हणाले.
आम्ही जे म्हटलं ते करुन दाखवलं. अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात देखील झाली आहे. मिर्जापूरमध्येही माँ विध्यवासिनी यांचं भव्य मंदिर उभारलं जात आहे. याआधी काशी आणि अयोध्येला जाण्याची कुणी हिंमत करत नसे. पण मोदीजींनी भोलेनाथांचं दर्शन घेतल्यानंतर श्रमिकांवर पुष्पवर्षाव केला. असं कधी आजवर कोणत्याही पंतप्रधानांनी केलं आहे का?, असा सवाल उपस्थित करत योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं. पंतप्रधान मोदींसाठी संपूर्ण देश त्यांचं कुटुंब आहे. तर सपा, बसपा आणि काँग्रेससाठी केवळ त्यांचं स्वत:चं कुटुंबच त्यांचं आहे. जनतेची त्यांना काही पडलेली नाही, असा हल्लाबोल यावेळी योगी आदित्यनाथ यांनी केला.