Congress Star Campaigner : काँग्रेसकडून स्टार प्रचारकांची नवीन यादी जाहीर; सोनिया गांधी, मनमोहन सिंगांचे नाव पुन्हा गायब
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 01:34 PM2022-02-05T13:34:21+5:302022-02-05T13:47:17+5:30
Uttar Pradesh Assembly Elections 2022 : उत्तर प्रदेशात 20 फेब्रुवारीला तिसऱ्या टप्प्यातील 59 जागांवर मतदान होणार आहे, ज्यामध्ये हे सर्व नेते काँग्रेसच्यावतीने जनतेला आकर्षित करण्याचे काम करतील.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची (Uttar Pradesh Assembly Elections 2022) सर्व राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये तिसऱ्या टप्प्यासाठी काँग्रेसने स्टार प्रचारकांची (Congress Star Campaigner) यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे या यादीत राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याशिवाय गुलाम नबी आझाद, सचिन पायलट आदींच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे, तर सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांचा समावेश नाही.
काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी जारी केलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या स्टार प्रचारकांच्या नव्या यादीत राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्याशिवाय पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू, आराधना मिश्रा, गुलाम नबी आझाद, अशोक गेहलोत, कमलनाथ, भूपेश बघेल, सलमान खुर्शीद, प्रमोद तिवारी, पीएल पुनिया, राजीव शुक्ला, सचिन पायलट, दीपेंद्र सिंग हुडा, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन, नसीमुद्दीन सिद्दीकी, आचार्य प्रमोद कृष्णम, प्रदीप जैन आदित्य, रणजित सिंग जुदेव, हार्दिक पटेल, इम्रान पटेल, इम्रान प्रतापगढ़ी, वर्षा गायवाड आणि सुप्रिया श्रीनेट आदींचा समावेश करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशात 20 फेब्रुवारीला तिसऱ्या टप्प्यातील 59 जागांवर मतदान होणार आहे, ज्यामध्ये हे सर्व नेते काँग्रेसच्यावतीने जनतेला आकर्षित करण्याचे काम करतील. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर करणाऱ्यांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. विविध पक्षातील नेतेमंडळी पक्षांतर करताना दिसून येत आहे.
सात टप्प्यात विधानसभा निवडणूक
दरम्यान, यावेळी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या 403 जागांसाठी सात टप्प्यांत निवडणुका होणार असून 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. उत्तर प्रदेशामध्ये 10 फेब्रुवारी रोजी राज्याच्या पश्चिम भागातील 11 जिल्ह्यांतील 58 जागांवर मतदान होऊन विधानसभा निवडणुकीची सुरुवात होणार आहे. त्यानंतर 14 फेब्रुवारीला दुसऱ्या टप्प्यात 55 जागांसाठी, 20 फेब्रुवारीला तिसऱ्या टप्प्यात 59 जागांसाठी, 23 फेब्रुवारीला चौथ्या टप्प्यात 60 जागांसाठी, 27 फेब्रुवारीला पाचव्या टप्प्यात 60 जागांसाठी, 3 मार्चला सहाव्या टप्प्यात 57 जागांसाठी आणि 7 मार्चला सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात 54 जागांसाठी मतदान होणार आहे.