लखनऊ : उत्तरप्रदेश विधानसभेमध्ये आज बजेट अधिवेशनावेळी राज्यपालांचे भाषण होते. राज्यपाल भाषण करत असताना समाजवादी आणि बसपाच्या आमदारांनी जोरदार गोंधळ घातला. तसेच त्यांच्यावर कागदाचे गोळे करून फेकले. यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सपा-बसपा यांच्या कृत्याचा निषेध केला.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, सपा आणि बसपाच्या आमदारांनी राज्यपालांच्या भाषणावेळी त्यांचा अपमान केला आहे. राज्यपाल राम नाईक हे त्यांचे भाषण वाचत होते आणि हे आमदार अभद्रतेची सीमा ओलांडत होते. कोणत्याही अधिवेशनामध्ये त्याआधी सर्वपक्षीयांमध्ये चांगल्या प्रकारे वागण्याबाबत बोलतात. मात्र, जेव्हा कामकाज सुरु होते तेव्हा वेळ वाया घालवला जातो. सपा आजही गुंडागर्दी पासून बाहेर येऊ शकली नाहीय, अशी टीका त्यांनी केली.
विरोधकांनी राज्यपालांच्या भाषणावेळी कागदांचे गोळे फेकतानाच चले जावचे नारे दिले. तसेच सरकारविरोधात घोषणाबाजी केल्याने वातावरण तणावाचे झाले होते. यामुळे पहिल्या दिवशीच उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत कामकाज तहकूब केले आहे. या गोंधळादरम्यान सपाचे आमदार सुभाष पासी बेशुद्ध पडले. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे.